कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगेची पातळी 56 फुटांवर पोहचली आहे. शुक्रवार रात्रीपासून पावसाने उसंत घेतली त्यामुळे पंचगंगेची पातळी स्थिर आहे. दरम्यान पूरग्रस्तांचं बचावकार्य सुरू झालं आहे. पंचगंगेच्या काठावर वसलेल्या चिखली गावा पाणी शिरल्याने अनेकांनी छतांचा आसरा घेतला आहे. NDRF च्या मदतीने या ठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येतं आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूरमध्ये NDRF च्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. आणखी चार तुकड्या कोल्हापूर विमानतळावर दाखल होतील. यात 25 जवान आणि तीन बोटींचा समावेश आहे. गेल्या चार दिवसात कोल्हापूरमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. 2019 ला झालेल्या महापुराच्या वेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 55.6 इंचांवर होती. यावर्षी नदीची पाणी पातळी 56 फुटांवर गेली आहे. त्यामुळे कोल्हापूरकर पुराच्या तडाख्यात अडकले आहेत.
मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पावसाने उसंत घेतली आहे. मध्यरात्री पंचगंगा नदीचं पाणी 56 फुटांवर होतं. धरण क्षेत्रात पाऊस पडतो आहे. आज सकाळपासून तीन इंचाने पाणी पातळी उतरली आहे. पुणे बंगलोर राष्ट्रीय मार्गावर अजूनही पाणी असल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प आहे.
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. किणी टोल नाका तसेच बेळगाव जिल्ह्यतील यमगर्णी व निपाणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत अडथळे आले आहेत. पुणेबंगळुरु महामार्गालगत सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा व बंगळुरु-पुणेकडून शिरोलीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावर 4 फूट पाणी असल्याने बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी बेरीकॅटिंग करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यत अनेक ठिकाणी वीजपुरवठय़ाचा बोजवारा उडाला. कोल्हापूर शहर विभागातील ३ उपकेंद्रे, १९ वीजवाहिन्या, 503 वितरण रोहित्रे बंद असल्याने 50 हजार 323 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. दोन्ही ग्रामीण विभागातील 72 हजार ग्राहकांच्या वीजपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. याच्या नियंत्रणासाठी पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे कोल्हापुरात दाखल झाले आमि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
ADVERTISEMENT