राज्यातील विद्यार्थी व पालकांसाठी ज्या निर्णयाकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागलं होतं. तो निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाई शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.
अखेर शिक्षण विभागाने यासंबंधी नियोजन केलं होतं. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. तर शहरी भागात आठवी ते १२वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
या निर्णयाबद्दल माहिती देताना राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘ ७ जुलै २०२१ रोजी शासन आदेश काढला होता आणि ग्रामीण भागातील जे भाग कोविडमुक्त झाले आहेत. अशा ठिकाणी ८वी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली होती.’
‘तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होती. त्यानंतर टास्क फोर्स आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केली. त्यांच्याकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि इतर गोष्टींबद्दल सूचना करण्यात आल्या आहेत’, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
‘शालेय समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात आयुक्त, शिक्षणाधिकारी आणि पालक संघटनांचा यात समावेश असेल. ग्रामीण भागात आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील, तर शहरात महापालिकेचे आयुक्त अध्यक्ष असतील. ४ ऑक्टोंबरपासून ग्रामीण भागातील ५वी ते १२वी आणि शहरातील ८वी ते १२वी या शाळा सुरू करत असताना टास्क फोर्सची चर्चा सुरू केली. आरोग्य विभागाशीही चर्चा केली आहे आहे. मुख्यमंत्र्यांनीही याला आज मंजुरी दिली आहे’, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
ADVERTISEMENT