महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board And Higher Secondary Education) दहावी (SSC) बारावी (HSC) मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचं नियोजन करण्यात यावं यासाठी परीक्षेचं संभाव्य टाइमटेबल जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
कधी होणार दहावीची परीक्षा? (SSC Board Exam)
दहावीची लेखी परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. २५ दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दहावी बोर्डाचं परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक
२ मार्च -प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
३ मार्च द्वितीय किंवा तृतीय भाषा
६ मार्च- इंग्रजी
९ मार्च-हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
११ मार्च -संस्कृत, उर्दू, गुजराती (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
१३ मार्च-गणित भाग १
१५ मार्च-गणित भाग २
१७ मार्च-विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
२० मार्च-विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
२३ मार्च-सामाजिक शास्त्र भाग १
२५ मार्च-सामाजिक शास्त्र भाग २
१२ वीची परीक्षा कधी होणार? (HSC Examination-2023)
१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान हे संभाव्य टाइमटेबल असून या संदर्भातली माहिती शाळांना दिली जाणार आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य उच्च आणि माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं हे संभाव्य टाइमटेबल म्हणजेच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरही पोस्ट करण्यात आलं आहे. शाळा, महाविद्यालयं यांना अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी यामुळे मदतच होणार आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना काही सवलती मिळाल्या होत्या. सुमारे दोन वर्षे कोरोनाचा कहर राज्यात होता. मात्र या परीक्षेला म्हणजेच २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कुठलीही जादा सवलत मिळणार नाही.
शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT