मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे शुक्रवारी मध्यरात्री महाराष्ट्रात अनलॉकची घोषणा करण्यात आली. नवीन सरकारी आदेशांनुसार पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे. कोरोना पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या या दोन निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत.
ADVERTISEMENT
सरकारने एकूण ५ स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली असून जिल्ह्यांमधील प्रवासासंदर्भातल्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. खासगी गाड्या, टॅक्सी आणि बसने लांबचा प्रवास करण्यासंदर्भात महत्वाचे बदल झाले आहेत. जाणून घेऊयात ई-पास संदर्भात नियमांमध्ये काय बदल करण्यात आला आहे?
१) पहिल्या गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ई-पासची गरज लागणार नाही. परंतू पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये किंवा या जिल्ह्यांना लागून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुम्हाला ई-पास काढावा लागणार आहे.
२) दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटातील जिल्ह्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. संसर्गाचा धोका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करायचा असेल तर ई-पासची गरज लागणार आहे.
३) पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्ये ई-पासची सक्ती कायम असणार आहे. पाचव्या गटातील जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना तुम्हाला ई-पास काढावा लागणार आहे. पाचव्या गटात येणाऱ्या जिल्ह्यातील लोकांना बाहेर जायचं असेल तर विशेष कारणांसाठी ही सवलत दिली जाणार आहे. ज्यामध्ये वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करायचा असेल तरच हा पास दिला जाईल.
जाणून घ्या महाराष्ट्रातले कोणते जिल्हे कोणत्या गटात मोडत आहेत?
पहिल्या स्तरातले जिल्हे – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसऱ्या स्तरातले जिल्हे – हिंगोली, नंदुरबार
तिसऱ्या स्तरातले जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
चौथ्या स्तरातले जिल्हे – पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
पाचव्या स्तरातले जिल्हे – या गटात अद्याप कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नसलं तरीही आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचा पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर गेला तर हा जिल्हा या रेड झोनमध्ये येऊ शकतो.
(विशेष टीप : – सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हे संभाव्य जिल्हे या गटवारीत मोडले जातात. परंतू यासंबंधीचा अंतिम निर्णय हा स्थानिक जिल्हा-पालिका प्रशासन घेणार आहे.)
जिल्ह्यांची वर्गवारी करताना राज्य सरकारने जाहीर केलेले निकष –
१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे
२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे
५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
ADVERTISEMENT