काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आज साताऱ्यात पहायला मिळाला. वाईवरुन पाचगणीला जाणारी एक कार पसरणी घाटात ४०० फूट खोल दरीत कोसळणार होती. परंतू मध्येच आलेल्या एका झाडामुळे ही कार अडकली आणि या कारमधील कुटुंब सुखरुप वाचलं.
ADVERTISEMENT
पसरणी घाटात सोळा नंबर स्टॉप जवळ चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. ज्यामुळे गाडी संरक्षक कठडा मोडून दरीच्या दिशेने जात होती. परंतू मधल्या झाडामध्ये ही गाडी अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. हे झाड मध्ये नसतं तर गाडी थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली असती. या गाडीतून पुण्यात राहणारे कुलीन ठक्कर आणि त्यांचा परिवार प्रवास करत होता.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नसून सर्वजण सुरक्षित आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. परंतू एका झाडामुळे ठक्कर कुटुंबाला मिळालेल्या जीवदानाची स्थानिक भागात सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
सातारा : कराडमध्ये अतिवृष्टी, अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत
ADVERTISEMENT