मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेलं भाषण चांगलंच गाजलं. तसंच राज ठाकरे हे आता कोकण दौराही करत आहेत. कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्तम पर्याय कसा ठरू शकतो हेदेखील राज ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात सांगितलं. राज ठाकरे हे उत्तम राजकारणी आहेत. शिवसेनेपासून त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरूवात झाली. त्यानंतर पुढे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांनी स्थापन केला. आपण जाणून घेणार आहोत की राज ठाकरेंचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या ठाकरे या घराण्यातले महत्त्वाचे राजकारणी
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष १९ जून १९६६ ला स्थापन केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत महत्त्वाच्या नेत्यांची दुसरी फळीही तयार केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याच फळीतले एक महत्त्वाचे नेते ठरले. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या आधी राजकारणात आले. वयाने उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा लहान असूनही राज ठाकरे यांचा शिवसेनेतला अनुभव त्यांच्यापेक्षा मोठा ठरला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही ही बाब त्यांच्या एका मुलाखतीत विशद केली होती.
बाळासाहेब ठाकरेंसारखाच करीश्मा
बाळासाहेब ठाकरे हे बोलायला उभे राहिले की त्यांच्या बोलण्याचं गारूड समोरच्या उपस्थितांवर होत असे. राज ठाकरे यांच्याकडेही असाच करीश्मा आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे भाषण करतात. त्यांना पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचा भास त्यांच्यात होतो. बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून एके काळी राज ठाकरेंकडेच पाहिलं गेलं. मात्र ही सूत्रं उद्धव ठाकरेंच्या हाती आली आणि त्यानंतर शिवसेनेच्या राजकारणाची दिशाच बदलली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या तुलनेत काहीसे उशिरा राजकारणात आले मात्र त्यांच्याकडे शिवसेनेचं कार्याध्यक्ष पद आलं आणि राज ठाकरे यांची पक्षातली नाराजी वाढू लागली. बाळासाहेब ठाकरेंच्या समोरच या सगळ्या गोष्टी घडत होत्या.
राजकारणासोबतच व्यंगचित्रांचेही धडे बाळासाहेबांकडूनच
राजकारणाप्रमाणेच राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेचे धडेही बाळासाहेब ठाकरेंकडूनच घेतले. लोकसत्तासाठी ते व्यंगचित्रही काढत होते. राज ठाकरे यांनी कुंचला हाती घेतला आणि त्याच्या फटकाऱ्यांमधून आपणही बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच कुंचला वापरून राजकीय परिस्थितीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य करू शकतो हे दाखवून दिलं. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरे हेदेखील उत्तम नक्कल आपल्या भाषणांमधून करतात. जयंत पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आर. आर. पाटील, रामदास आठवले, सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव, शत्रुघ्न सिन्हा या नेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणांमधून आत्तापर्यंत अनेकदा केली आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जाते. मात्र गर्दीशी बोलण्याची त्यांची ही लकब आणि समोरच्यांना शब्दांमधून आपलंसं करून घेण्याची त्यांची ही कला अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. राज ठाकरे हे एक उत्तम वक्ते आहेत. त्यांची भाषणं ऐकायला जी गर्दी होते ती हेच सांगून जाते.
२००६ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र
२००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. डिसेंबर २००५ मध्येच राज ठाकरे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणं हा पर्याय खुला ठेवला नाही. त्याउलट त्यांनी एक पक्ष स्थापन केला ज्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शिवसेना सोडताना केलेलं राज ठाकरेंचं भाषण हे अजूनही लोकांच्या लक्षात आहे. माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे हे त्यांचं वाक्य अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंनी सुरूवातीला निळा, भगवा आणि हिरवा रंग असलेला झेंडा घेतला होता. मात्र आता तो झेंडा छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत अनेक आंदोलनं केली
मराठी पाट्यांसाठीचं केलेलं मनसेचं आंदोलन खूप गाजलं. तसंच शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा मनसेने हायजॅक केला आहे का? ही चर्चाही त्यावेळेस झाली. अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ मराठीत घेतली नसल्याने मनसेचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत राडा घातला होता. अबू आझमी विरूद्ध मनसे असा सामना राम कदम यांच्या आक्रमकतेमुळे पाहण्यास मिळाला होता. तसंच महाराष्ट्रातल्या टोल विरोधातही राज ठाकरेंनी मोठं आंदोलन केलं होतं. रेल्वे भरतीत मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी राज ठाकरे आक्रमक झाले होते. तसंच पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडमध्ये का? यासाठीही त्यांनी आंदोलन उभं केलं होतं. सुरूवातीच्याच काळात राज ठाकरे यांचा करीश्मा इतका वाढला होता की त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र नंतर नंतर राज ठाकरेंचा वाढलेला करीश्मा काहीसा अस्ताला गेला हे वास्तवही नाकारता येणार नाही
नाशिक महापालिकेची सत्ता राज ठाकरेंकडे
२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले. राज ठाकरेंसाठी हे मोठं यश होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रचारसभेत छगन भुजबळ यांची केलेली नक्कल ही मनसेला मतं मिळवून देण्यात खूप मोठा हातभार लावून देणारी ठरली. त्याचवर्षी मुंबई महापालिकेत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते.
नाशिकमध्ये नंतर नेमकं काय घडलं?
आपल्या करीश्म्याच्या जोरावर राज ठाकरेंनी नाशिक मनपाची सत्ता मिळवली… मात्र भाजपनं पाठिंबा काढल्यावर सत्ता टीकवायची असेल तर कोणाचा ना कोणाचा आधार घेण्याची गरज होती. राज ठाकरेंनी भुजबळांशी हातमिळवणी केली. ज्या भुजबळांचा गळा आवळण्याची भाषा करून आणि जोरदार टीका करून राज ठाकरेनी नाशिकची सत्ता मिळवली होती सत्ता टिकवण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा भुजबळांच्या साथीला राज ठाकरे गेले. त्यामुळे नाशिककरांचा विश्वास राज ठाकरेंवरून उडाल्याचीही चर्चा झाली.
२०१२ च्या महापालिका निवडणूक प्रचारात ठाकरे घराण्याचं रक्त चरित्र
२०१२ मध्ये ज्या महापालिका निवडणुका झाल्या त्या निवडणुका मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या होत्या. या सगळ्या निवडणुकांच्या प्रचारात रंगलं होतं ते ठाकरे घराण्याचं रक्तचरित्र. कारण काका बाळासाहेब ठाकरे विरूद्ध पुतण्या राज ठाकरे अशी शाब्दिक चकमक या प्रचारात पाहण्यास मिळाली. राज ठाकरेंच्या आजारपणात त्यांना दिलेलं चिकन सूप याचा उल्लेख राज ठाकरेंनी केला होता. ज्यावरून त्यांना नंतर स्पष्टीकरण द्यावं लागलं. तर बाळासाहेब ठाकरे यांनी काय करून दाखवू नकला करून दाखवू की आवाज काढून दाखवू? माझी स्टाईल उचलाल पण विचार कुठून आणाल असा खडा सवाल राज ठाकरेंना केला होता.
बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर भावूक झालेले राज ठाकरे
नोव्हेंबर २०१२ मध्ये राज ठाकरेंचं राजकीय गुरू आणि त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंइतकेच भावूक झालेले राज ठाकरे हे महाराष्ट्राने पाहिले. राज ठाकरे हे त्या दिवशी ढसाढसा रडत होते. एक आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या राज ठाकरेंचा हळवा कोपरा या दिवशी सगळ्यांच्या समोर आला.
२०१४ पासून मनसेला उतरती कळा
२०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला अपयशाचा सामना करावा लागला. टोलचा मुद्दा या काळातही राज ठाकरेंनी उचलला होता. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी एक जागा निवडता आली. यानंतर महापालिका निवडणुका आल्यानंतर म्हणजेच २०१७ मध्ये मनसे शिवसेना एकत्र येणार अशाही चर्चा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे टाळी मागितल्याच्या वक्तव्यानंतर झाल्या होत्या. मात्र यातलं सत्य नुकतंच समोर आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे त्यावेळी भाजपसोबत जाऊ नयेत म्हणून केलेली ती खेळी होती असं बाळा नांदगावकर यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
२०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मोदी-शाह यांच्या विरोधात प्रचार
मनसे अध्यक्ष पक्षाला नवी उभारी देण्याच्या प्रयत्नात असतानाच २०१९ ला पुन्हा एकदा चर्चेत आले. कारण निवडणुका लागण्याच्या आधी अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे एक पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत पत्रकार परिषद घेतलेली पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यात राज ठाकरेंनी सभा घेऊन लाव रे तो व्हीडिओ म्हणत मोदी आणि अमित शाह यांच्यावर यथेच्छ टीका केली. मात्र २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश देशपातळीवर मिळालं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.
२०२२ ला बाळासाहेंबाचा वैचारिक वारसा चालवणारा मीच म्हणून जाहीर
२०१९-२०२० या दोन वर्षांमध्ये कोव्हिडचा काळ राज ठाकरेच काय संपूर्ण जगाने अनुभवला. त्यावेळी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. राज ठाकरे मास्क लावत नव्हते त्यावरून झालेली टीकाही आणि टोमणेही त्यांनी ऐकले. २१ जून २०२२ ला जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हा राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटाच्या जवळ गेले. सातत्याने भाजप नेते आणि एकनाथ शिंदे गट यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. एवढंच काय दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका भाषणात राज ठाकरे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहोत आपल्याला त्यासाठी पक्ष किंवा कुठल्या पदाचीही गरज नाही असंही जाहीर करून टाकलं. एप्रिल आणि मे २०२२ या दोन महिन्यांमध्ये त्यांनी घेतलेली मशिदींवरच्या भोंग्याविरोधातली भूमिका आणि त्याविरोधात हनुमान चालीसा लावू हे सांगणारं जे आंदोनल उभं केलं तेदेखील राज्याने पाहिलं आहे. राज्यात जो सत्ता बदल झाला त्याचं राजकारण तापवण्यासाठी या सभा उपयोगालाच आल्या असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.
शिवसेनेपासून सुरू झालेला राज ठाकरेंचा राजकीय प्रवास हा मोठा रंजक आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चढ उतार आपल्या कारकिर्दीत पाहिले आहेत. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पाहणारा आणि महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार असलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळेच आजही त्यांचं नाव समोर आलं की आक्रमकताही ओघाने येतेच. आता राज ठाकरे पुढे काय पावलं टाकणार आणि आपल्या पक्षाला नवसंजीवनी कशी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT