कल्याण : निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिलेलं मशाल चिन्ह परत घ्यावं यासाठी समता पक्ष आक्रमक झाला आहे. 1994 पासून राष्ट्रीयकृत मशाल हे चिन्ह आमचे आहे असा दावा समता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ते पुन्हा आम्हाला मिळावं अशी मागणी समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चिन्ह आता ठाकरे गटाला दिले आहे. यावर हरकत घेत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह आमचा असल्याचा दावा करत ते पुन्हा आम्हाला मिळावे अशा प्रकारची मागणी मेलद्वारे केली आहे. मात्र आयोगाकडून 2004 पासून समता पक्षाने निवडणूक लढवले नसल्याने हे चिन्ह दिले असल्याची माहिती समता पक्षाच्या अध्यक्षांना देण्यात आली.
याबाबत समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला लेखी पत्र दिले आहे. यात 2014 आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायतीमध्ये आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवल्या? हे जाहीर करावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर मशाल चिन्हावरून सुरू असलेल्या वादामुळे समता पक्षाच्या कार्यकर्ते व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता वर्तवत देवळेकर यांनी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली.
काय म्हणाले तृणेश देवळेकर :
चिन्ह हे कोणत्याही पक्षाची ओळख असते. धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसं दुःख झालं तसं दुःख आम्हालाही होतं आहे. झारखंडमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह झारखंड मुक्ती मोर्चाकडे आहे. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवली तर शिवसेनेला चालेल का? त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही आपलं मत जाहीर करावं.
पत्रात काय लिहिलं?
शिवसेनेला “मशाल” हे निवडणूक चिन्ह देण्यास आमचा आक्षेप आहे. कारण हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव आहे. 2004 मध्ये निवडणूक आयोगाने समता पक्षाला मान्यता नसलेला पक्ष म्हणून घोषित केले होते, परंतु यापूर्वी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. मशाल हे चिन्ह समता पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं.
समता पक्ष सातत्याने निवडणूक लढवत आहे, भविष्यात आपल्याला मान्यता प्राप्त होऊ शकते, मग हे चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला कसे देता येईल? त्यामुळे आपणास विनंती आहे की हे निवडणूक चिन्ह समता पक्षासाठी राखून ठेवावे. हे चिन्ह शिवसेनेकडून परत घ्यावे. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल, तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायव्यवस्थेकडेही जाऊ शकतो.
ADVERTISEMENT