मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित झाल्यानंतर टीकेचे धनी झालेले शिंदे सरकार आता गुजरातच्या औद्योगिक धोरणांचा अभ्यास करणार आहे. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेमध्ये एक शिष्टमंडळ आज एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहे.
ADVERTISEMENT
या शिष्टमंडळात उदयोग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि काही इतरही सचिव, अधिकारी यांचा समावेश आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आज या शिष्टमंडळाची गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासोबत बैठक होणार आहे.
दौऱ्यात काय अभ्यास होणार?
हे उच्चस्तरीय शिष्टमंडळ गुजरातच्या औद्योगिक सेन्ट्रलाईज्ड सिस्टीमचा आणि गुजरातच्या एकूणच औद्योगिक धोरणांचा अभ्यास या दौऱ्यात केला जाणार आहे. याशिवाय गुजरातमधील उद्योगांसाठी असलेल्या इतर सोई सुविधांचाही आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला :
महाराष्ट्रातील प्रस्तावित वेदांता-फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे सरकार असा सामना रंगला आहे. 3 महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप शिंदे सरकारवर होत असून याचा ठपका थेट उदय सामंत यांच्यावर ठेवण्यात येत आहे.
फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?
हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. “एखादा उद्योग येतो. एखादा उद्योग येत नाही, इथंपर्यंत ठिक आहे, पण हा उद्योग महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. या उद्योगामुळे इतर उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. त्यांच्या अनुषंगाने अनेक कंपन्यांची साखळी तयार झाली असती.
सेमीकंडक्टर निर्मिती ज्याची आज जगाला गरज आहे. महाराष्ट्राने यात मोठे योगदान दिले असते. मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्राचा शब्द महत्त्वाचा ठरतो. तिथे केंद्र सरकार समर्थ असल्यामुळे आता किती उद्योग महाराष्ट्रातून गुजरातकडे जातील, हे बघत राहण्याची पाळी महाराष्ट्रावर आली आहे का असा प्रश्न निर्माण होतो”, असे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
ADVERTISEMENT