राज्यात महिलांवरील वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच आज पुण्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील हडपसर भागात एका १४ वर्षीय मुलीवर बापाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, नराधम बापाला हडपसर पोलिसानी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
सुनील राठोड (वय ३८) असे आरोपी वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील राठोडने मुलगी घरामध्ये झोपली असताना, तिला किचनमध्ये ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
अत्याचार केल्यानंतर याबद्दल तू आईला सांगितलं, तर तिला जिवे मारून टाकेन, अशी धमकीही आरोपीने मुलीला दिली होती. मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर आरोपीने दुसर्या दिवशी मुलीच्या आईला घराबाहेर हाकलून दिले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.
या दोन्ही घटना १ आणि २ मार्च दरम्यान घडल्या आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी सुनील राठोड याला अटक केली, असं हडपसर पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT