मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांमुळे राज ठाकरेंनी राज्यातलं राजकारण चांगलंच तापवलं आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी या सध्याच्या राजकीय रणधुमाळीतही आपली वाचनाची आवड जोपासलेली पहायला मिळाली.
ADVERTISEMENT
दोन दिवस पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी मंगळवारी रात्री आठ वाजता पुण्याच्या बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीतून पुस्तकांची खरेदी केली.
संध्याकाळी आठ वाजता राज ठाकरे आपल्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत अक्षरधारा बुक गॅलरीत पोहचले. यावेळी राज ठाकरेंनी बराच वेळ या दुकानात घालवला. पुस्तकालयातला एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागला आहे. ज्यात राज ठाकरे एक-एक पुस्तक निरखून पाहताना दिसत आहेत.
या छोटेखानी भेटीमध्ये राज ठाकरेंनी अक्षरधारा बुक गॅलरीतून मराठी रिसायद, ब्रिटीश रिसायद, शिवाजी सावंत यांची काही पुस्तकं, वा.सी.बेंद्रे यांची काही पुस्तकं, शिवशाही आणि पेशवे घराण्याचा इतिसाह अशी काही पुस्तकं खरेदी केली.
जगू द्याल की नाही? जेव्हा Raj Thackeray पुण्यात पत्रकारांवर संतापतात, पाहा व्हिडीओ
दरम्यान या बुक गॅलरीत जाण्याआधी बाहेर उपस्थित असलेल्या पत्रकारांना राज ठाकरेंच्या संतापाचा सामना करावा लागला. प्रसारमाध्यमांनी अक्षरधारा बुक गॅलरीबाहेर गर्दी केली होती. कॅमेऱ्याच्या लाईटचा त्रास होत असलेल्या राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त करत, लाईट बंद करायला सांगत, जगू द्याल की नाही? असा प्रश्न विचारत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली.
मुंबई-ठाणे आणि औरंगाबाद येथील सभांमध्ये मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा गाजवल्यानंतर राज ठाकरे आपली चौथी सभा पुण्यात घेणार असल्याचं कळतंय. २१ मे रोजी ही सभा होणार असल्याचं कळतंय. पुण्यातील भिडे पुलाशेजारी असलेल्या नदीपात्राचं ठिकाण निवडण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्यांकडून आणि पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी केली जाईल. या सभेला काय नियम आणि अटी लावायच्या? याचा निर्णय पोलीस घेतील असंही मनसेने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT