डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे आज, उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात अमित ठाकरे कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चारही विधानसभा क्षेत्रामधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यासाठी अमित राज ठाकरे मुंबईवरून डोंबिवली लोकलने येणार आहेत.
ADVERTISEMENT
महापालिका निवडणुकीसाठी इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे पिता-पुत्रांनी पक्षबांधणीसाठी शहरे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला, तर अमित ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला.
पुणे व नाशिकनंतर अमित ठाकरे आता 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, शिरीष सावंत हे या दौऱ्यात असणार आहेत.
दोन वेगवेगळ्या टीममध्ये हे नेते येणार असून, शाखाध्यक्षांपर्यंत बैठका घेतल्या जाणार आहेत. अमित ठाकरे आणि इतर नेते राजकीय विषयांवर स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच विभागानुसार शाखा अध्यक्षांसोबतही चर्चा करणार आहेत.
पॅनल पद्धत, त्रिसदस्यीय पद्धत की एकल निवडणूक यावरही या दौऱ्यात चर्चा केली जाणार असून, त्यानुसार आखणी केली जाणार असल्याची माहिती आहे. पदाधिकाऱ्यांची बांधणी, प्रभागात झालेली कामे, रिक्त जागा कशा भरायच्या यावर साधारण चर्चा होईल, असं सांगितलं जात आहे.
डोंबिवलीमधील बैठका प्रीमियम ग्राऊंड आणि सर्वेश हॉल येथे होणार आहेत. तर कल्याण येथील बैठका कल्याण पूर्व येथील शिवराम पाटील वाडी आणि कल्याण पश्चिमेला असलेल्या जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे होणार आहेत.
आगामी निवडणुकांसाठी मनसे कामाला लागली आहे. सुरवातीला पुणे, नाशिकवर लक्ष्य केंद्रीत करून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहराचा एकाच महिन्यात दोन वेळा दौरा केला. त्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर अमित ठाकरे यांनीही नाशिक शहराचा दौरा केला. पुणे, नाशिकनंतर राज यांनी कल्याण डोंबिवलीकडे आपले लक्ष केंद्रीत केलं आहे.
ADVERTISEMENT