डोंबिवली : आमचे सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरुन तारा जुळले की सर्व जुळून येईल, असं म्हणतं मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना-मनसे या संभाव्य युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी आज डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान येथे परिवार सोबत जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
यावेळी आमदार राजू पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे कार्यालयाला दिलेल्या भेटीबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, शिवतीर्थावर राज ठाकरे गेल्या दहा वर्षांपासून रोषणाईचा कार्यक्रम घेत आहेत. यंदा त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं होतं. शिवतीर्थावरील रोषणाईप्रमाणेच आम्ही फडके रोडवरही रोषणाई केली होती.
असे कार्यक्रम होत असताना एकमेकांच्या गाठीभेटी होत असतात. कार्यक्रम हा फडके रोडवर अशा ठिकाणी होता की जिथं सर्व प्रकारच्या सर्व संस्थांच्या, सर्व पक्षांचे कार्यक्रम होत असतात. दिवाळीच्या किंवा अशा चांगल्या सणाच्यावेळी कोणी आडकाठी करत नाही, आपली संस्कृती पण नाही.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्या भागात कार्यक्रम ठेवला होता, त्याच भागात आमचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यावेळी मनसेच्या शहराध्यक्षांनी त्यांना भेट देण्याची विनंती केली. ते आले तेव्हा बरं वाटतं की राजकारणात विरोधक असलो तरी आम्ही दुश्मन नाही, वैयक्तिक असं काही नसतं. एकमेकांना चांगल्या शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळं दिसतं परंतु सगळ्या गोष्टी तशा नसतात. राजकारण तसं नसतं.
युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. पण त्यांनी आदेश दिले आहेत की निवडणुका स्वबळावर लढावायच्या आहेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. पण साहेबांनी सांगितलं युती करायची. तर ती देखील आमची तयारी आहे. मात्र एक नक्की की, आमची सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळले की सर्व जुळून येईल.
ADVERTISEMENT