मनसे अध्यक्ष राज ठाकरे गणपती झाल्यानंतर नागपूर आणि विदर्भाचा दौरा करणार असल्याची चर्चा आहे. मनसे आणि भाजप यांची युती होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपली संघटना वाढवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर म्हणजेच गणेश उत्सव संपल्यावर राज ठाकरे नागपूरसह विदर्भाचा दौरा करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले दिसत आहेत. खासकरून त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे समोर आणला आहे. गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर आणि त्यानंतर झालेल्या सभानंतर मशिदींवरचा भोंगे आणि हनुमान चालीसा हे मुद्दे राज ठाकरेंनी मांडले. तसंच नुकत्याच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यातही राज ठाकरेंनी आपण बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा पुढे चालवत आहोत असं म्हटलं आहे त्यासाठी आपल्याला चिन्हाची किंवा पदाची गरज नाही असंही म्हटलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा असेल यात काहीही शंकाच नाही.
विदर्भात राज ठाकरेचा दौरा नेमका कधी होणार?
विदर्भात राज ठाकरेंचा दौरा नेमका कधी होणार? याबाबत आम्ही नागपूरचे मनसेचे सरचिटणीसहेमंत गडकरी यांना विचारलं असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितलं की दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदिरात राज ठाकरेंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी गणपतीनंतर विदर्भाचा दौरा करणार असल्याचं सूतोवाच केलं. मात्र या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे नेमकी तारीख काय असेल हे मुंबईतूनच ठरेल असं हेमंत गडकरी यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंवर नुकतीच पार पडली शस्त्रक्रिया
राज ठाकरेंवर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोन महिने आराम केल्यावर राज ठाकरे हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. अशात राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे हे जर विदर्भात गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणखी जोर मिळेल. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पुकारलेलं बंड आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. अशात राज ठाकरे हे मनसेला पर्याय म्हणून पुढे आणत आहेत. विदर्भातही ते आपली ताकद वाढवण्यासाठीच जातील यात काहीही शंका नाही. त्यामुळे त्यांचा दौरा किती तारखेला होणार? आणि ते पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार त्यांना कसं बळ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT