गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांचा मनसेने समाचार घेतला आहे. शिवसेनेच्या वळचणीला गेलेल्या दिपाली सय्यद यांचा नाव बदलण्याचा इतिहास सांगत सरडाही रंग बदलत नाही इतकी तुम्ही नावं बदलता अशी टीका मनसेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
दिपाली सय्यद यांना मनसेने संधीसाधू ताई म्हटलं आहे. “तुम्हाला तुमचं नावही धड माहिती नाही. प्रत्येकवेळी राजकारणासाठी तुम्ही नाव बदलत आलात. 2014 साली अहमदनगरमधून निवडणुक लढवली तेव्हा दिपाली सय्यद, 2019 ला शिवसेनेकडून मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा सोफीया जहांगीर सय्यद हे नाव ठेवलं. शिवसेना आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी दिपाली भोसले-सय्यद. वारंवार राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही संधीसाधू ताई आहात. तुम्हाला काय उत्तर द्यायचं, इतके दिवस वाईड बॉल म्हणून तुम्हाला आम्ही उत्तर देत नव्हतो”, असं अखिल चित्रे म्हणाले.
परंतू वारंवार जर तीच गोष्ट तुम्ही बोलत राहणार असाल तर 2014 पासून आतापर्यंत तुम्ही तुमचे विचार आणि नाव बदलण्यामागचा प्रवास आहे त्याचं रहस्य एकदा लोकांसमोर येऊ द्या. सरडाही जितके रंग बदलत नाही तेवढी तुम्ही नावं बदलत आला आहात. त्यामुळे आधी हे रहस्य पुढे येऊ द्या आणि मग हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार मांडा असाही टोला मनसेने लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी चर्चेत आणलेला मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा असो, हनुमान चालीसा पठन असो किंवा मग अयोध्या दौरा असो प्रत्येक बाबतीत दिपाली सय्यद राज ठाकरे आणि मनसेवर टीका करत आल्या आहेत. या टीकेचा आज मनसेने समाचार घेतल्यानंतर आता दिपाली सय्यद काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT