कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण लक्षात घेता राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांचा लेव्हल ३ मध्ये समावेश करुन, दुपारी ४ नंतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु मुंबईत या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी दुपारी ४ नंतर दुकानं सुरु ठेवण्यासाठी १ ते ५ हजारांची वसुली केली जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात दादर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनबाहेरील फुल मार्केट, भाजी मार्केट आणि नक्षत्र मॉल परिसरातील दुकानं चार वाजल्यानंतरही कशा पद्धतीने सुरु असल्याचं देशपांडेंनी दाखवलं आहे. दुपारी ४ नंतर दुकानं सुरु ठेवण्यासाठी मोठ्या दुकानांकडून ५ हजार, मध्यम दुकानांकडून २ तर छोट्या दुकानदारांकडून १ हजाराची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप देशपांडे यांनी केलाय.
देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काही दुकानदार शटर अर्ध उघडं ठेवून दुकानातील काही कर्मचाऱ्यांना बाहेर करुन पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत दुपारी ४ नंतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरीही मुंबईत या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं पहायला मिळतंय.
ADVERTISEMENT