गेल्या ४ दिवसांपासून शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने आज मुंबईत विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने रविवार आणि सोमवार या दोन दिवशी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतू रात्री उशीरा हवामान विभागाने यात बदल करुन मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला. आज सकाळपासून मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
अतिवृष्टीच्या ढगांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवल्यामुळे हवामान विभागाने मुंबईला दिलेला रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या ४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. परंतू आज सकाळपासून शहरात पावसाची हजेरी नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात पहायला मिळाली.
दरम्यान मुंबईचा धोका कमी झाला असला तरीही रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांसाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाण्यात Orange Alert! रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव काल दुपारी तीन वाजता च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक 5 जुलै 2020 रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे 24 दिवस आधी भरून वाहू लागला आहे.
545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT