कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणारं मुंबई शहरं हळुहळु सावरत असल्याचं चित्र आज पहायला मिळालं. आज शहरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ३ हजार ३९ नवे रुग्ण सापडले असून ४ हजार ५२ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या लाटेचा सामना करणाऱ्या मुंबई शहरासाठी हे आश्वासक चित्र मानलं जात आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत सध्याच्या घडीला रुग्णसंख्या बरी होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहचलं आहे. दरम्यान आज ७१ रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई महापालिका आणि अन्य आरोग्य यंत्रणांना आपले प्रयत्न अशाच पद्धतीने सुरु ठेवावे लागणार आहेत.
कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळावं यासाठी मुंबई महापालिका गेल्या काही दिवसांपासून लसीकरणावर भर देते आहे. परंतू काही केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणाला खीळ बसतो आहे. अशा परिस्थितीत लसीकरणावरुन सत्ताधाऱ्यांमध्येच मानापमान नाट्य पहायला मिळतं आहे. वांद्रे पूर्व मतदार संघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करत, परब माझ्या मतदारसंघात मी करत असलेल्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचं म्हटलं आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्व मतदार संघात समाज मंदीर येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं. या लसीकरण केंद्राचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. परंतू या मतदार संघाचे आमदार असलेल्या झिशान सिद्दीकी यांना महापालिकेने या कार्यक्रमासाठी आमंत्रणच दिलं नाही. ज्यामुळे झिशान सिद्दीकी नाराज असल्याचं बोललं जातंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला झिशान सिद्दीकी यांच्याविरोधात निवडणूकीत उभे राहिलेले विश्वनाथ महाडेश्वर यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, परंतू सिद्दीकी यांना बोलावण्यात आलं नाही. ज्यामुळे सिद्दीकी नाराज आहेत.
ADVERTISEMENT