कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका सध्या चर्चेत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली असली तरीही आता डेल्टा प्लस या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. अशात मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेच्या आकडेवारीनुसार 50 टक्के लहान मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने 6 ते 18 या वयोगटातील दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते.
ADVERTISEMENT
36.30% टक्के मुंबईकरांमध्ये तयार झाले अँटीबॉडीज; तिसऱ्या सेरो सर्व्हेक्षणातून समोर आली माहिती
काय नमूद करण्यात आलं सर्व्हेमध्ये ?
सेरो सर्व्हेच्या निष्कर्षांनुसार, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या 50 टक्क्यांहून जास्त बालकांना याआधीच करोनाची लागण होऊन गेली आहे. पेडियाट्रिक श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये सरासरी सेरो पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 51.18 टक्के इतका आढळून आला. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमाण 54.36 टक्के तर खासगी क्षेत्रातील मुलांचं प्रमाण 47.03 टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे.
या सर्व्हेसाठी 1 ते 18 वयोगटातील मुलांचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये1 ते 4 वयोगटामध्ये 51.04 टक्के, 5 ते 9 वयगटामध्ये 47.33 टक्के, 10 ते 14 वयोगटामध्ये 53.43 टक्के आणि 15 ते 18 वयोगटामध्ये 51.39 टक्के सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे. 10 ते 14 या वयोगटामध्ये सर्वाधिक सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे.
Zydus Cadila vaccine: मोठी बातमी… ‘या’ महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस!
या सर्व्हेमधून गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेरो पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचं समोर आलं आहे. याआधी मार्च महिन्यामध्ये तिसरा सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये 1 ते 18 वयोगटातील लोकसंख्येमध्ये सेरो पॉझिटिव्हिटी रेट 39.4 टक्के इतका होता. आता तो 50 टक्क्यांच्याही वर गेला आहे.
या सर्व्हेनंतर पुन्हा एकदा कोरोना आणि तो होऊ नये यासाठी घेतली जाणारी काळजी या गोष्टींची जनजागृती आवश्यक आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईतील महानगर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत हा सर्वे करण्यात आला होता. लहान मुलांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याची मतं अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुसऱ्या लाटेदरम्यानच हा सेरो सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते.
ADVERTISEMENT