कलेक्टर म्हणलं तर प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी. कलेक्टर होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण मराठवाड्यात एक असा देखील कलेक्टर होऊन गेलाय ज्याच्यावर अनेक खुनाचे खटले चालले. त्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देखील झाली होती. निजामकाळात अवघ्या 8 महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा कलेक्टर राहिलेला मोहंमद हैदर, ज्याच्यावर रझाकारांसोबत मिळून अनेक खून केल्याचा आरोप होता. तर याच हैदरबाबत आपण जाणून घेणार आहोत, निजाम राजवटीतील शेवटचा आणि सर्वात वादग्रस्त कलेक्टर म्हणून मोहंमद हैदरची कारकीर्द अतिशय वादळी ठरली होती.
ADVERTISEMENT
राज्याच्या पोलीस प्रमुखाचा जावई
मोहंमद हैदर गौस, ज्याने उस्मानिया विद्यापीठातून 1936 साली चांगल्या गुणांसह बी.ए ची पदवी प्राप्त केली. पुढच्याचवर्षी हैदरने हैद्राबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन म्हणजेच HCS ची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी हैद्राबाद स्टेटमध्ये प्रशासकीय प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठवलं जायचं. हैदर प्रशिक्षण घेऊन आला आणि त्याला मुन्सिफ कोर्टात नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्याकाळचे हैद्राबाद स्टेटचे पोलीस प्रमुख DG ज्यांना त्याकाळी कोतवाल असं संबोधलं जायचं, त्या नवाब दिनीयार जंग बहादूर यांच्या मुलीशी हैदरचे लग्न झाले.
हैद्राबाद स्टेटमध्ये उस्मानाबाद जिल्हा होता संवेदनशील जिल्हा
हैद्राबादच्या पोलीस प्रमुखाचा जावई म्हणून हैदरचे वजन अधिकचे वाढले होते. अशात 1948 साली हैद्राबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले. स्टेटमधील संवेदनशील जिल्हा म्हणून उस्मानाबाद ओळखलं जाऊ लागलं. सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमा उस्मानाबादच्या लगत असल्याने स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्य भारतातील लोकांचं पाठबळ मिळत होतं. कारण अहमदनगर आणि सोलापूर हे जिल्हे निजाम राजवटीत येत नव्हते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून चळवळीला गती मिळत होती.
राज्याच्या उपसचिव पदावर काम करण्याची ऑफर
अशात स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळी आणि गोरगरिबांवर रझाकारांचा होणार अत्याचार, यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातला तत्कालीन कलेक्टर फरहतुल्लाह प्रशासन चालवण्यात अयशस्वी ठरला. उस्मानाबाद जिल्हा हा निजामांसाठी डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे कोणी अधिकारी यायला इथे धजावत नव्हता. अशात हैदरची बढती जवळ आली होती. त्याला मंत्रालयात उपसचिव पदावर काम करण्याची सूचना करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्याचं आव्हान स्वीकारलं
मात्र ती नाकारत हैदरने थेट संवेदनशील असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कलेक्टर ज्याला त्यावेळी तालुकादार असं म्हणलं जायचं, या पदावर जाण्याची तयारी दर्शवली. 33 वर्षीय हैदरने हे आव्हान स्वीकारल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. 5 जानेवारी 1948 साली हैदरने उस्मानाबाद जिल्ह्याचे सूत्र हाती घेतले. त्यावेळी स्टेट काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष फुलचंद गांधींच्या नेतृत्वात उस्मानाबादच्या सीमेवर कँम्प काढून स्वातंत्र्य सैनिकांनी प्रशासनाच्या नाकात दम आणला होता.
कलेक्टर म्हणून येताच चिलवडी गाव जाळण्याचे दिले आदेश
लगतच्या सोलापूर जिल्ह्यातून रसद मिळत होती. गुन्हा करून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पळून जाता येत होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमा निजामाची डोकेदुखी झाली होती. निजामाची इमाने इतबारे काम चाकरी करणारा हैदर स्वतःला रझाकार म्हणजेच स्वयंसेवक म्हणायचा. रझाकारांचा प्रमुख कासीम रझवीचा तो खास मित्र होता. यावेळी हैदरने कलेक्टर म्हणून घेतलेले निर्णय अनेकांच्या जीवावर बेतले. चिलवडी गावातील लोकांनी लेव्ही देण्यास नकार दिल्याने थेट वसुली अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे स्वतः हैदरने त्या गावात जाऊन संपूर्ण गाव जाळण्याचा पराक्रम हैदरने केला.
अनेक गावात सामान्य गावकऱ्यांना गोळ्या घालण्याचं काम हैदरने केलं. उपळा, अपसिंगा, ढेकरी, सारोळा, ईट या ठिकाणच्या लोकांना नाहकपणे गोळ्या घातल्या. या सर्व घटनांबाबत इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी आपल्या ‘हैद्राबाद मुक्तीसंग्रामात असे झुंजलो आम्ही’, या पुस्तकात सविस्तर लिहलं आहे. आपल्या अवघ्या आठ महिन्याच्या प्रशासकीय कार्यकाळात हैदरने जालियनवाला बागच्या जनरल डायरप्रमाणे वागला होता, असे या पुस्तकात म्हटलं आहे.
ऑपरेशन पोलोदरम्यान रानवनाने पळाला
अखेर 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने निजामाची जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी भारतीय सैन्य हैद्राबाद स्टेटमध्ये घुसवलं. आपलं काही खरं नाही म्हणून कोषागारमधून रक्कम घेऊन हैदर रानावनाने पळत सुटला. बेंबळी, ढोकी, मुरुड असं करत तो नांदेड, बिदर करत हैद्राबादला पोहचला. 17 सप्टेंबरला निजामाने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. पंतप्रधान लायक अली यांचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं. तात्पुरतं राजप्रमुख म्हणून निजामाची तर प्रशसकम्हणून मेजर जनरल जोयंतीनाथ चोधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
निलंबित करुनअटक
जोयंतीनाथ चोधरी यांना अनेक अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचे आढळून आले. त्यात हैदरचाही समावेश होता. 18 सप्टेंबर निलंबन तारीख दाखवून त्याला 19 फेब्रुवारी 1949ला त्याला अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर हैदरवर 24 वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले. त्यात 7 खटले हे गंभीर खुनाचे होते. अधिक खटले उस्मानाबादचे असल्याने त्याला मार्च 1949 साली उस्मानाबादच्या कारागृहात टाकण्यात आलं. कलेक्टर असताना अनेकांना जेलमध्ये धाडणारा हैदर आता स्वतः त्यांच्यासोबत आरोपी म्हणून राहत होता.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोणीही वकीलपत्रक घेतलं नाही
उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेवर अनेक अत्याचार केल्याने त्याचं वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही, अशी भूमिका उस्मानाबाद विधिज्ञ मंडळाने घेतली. यात उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध वकील नरसिंगराव देशमुख (काटीकर) यांनी वकील न मिळू देण्याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे त्याने हैद्राबादहुन 50 रुपये रोजाने प्रसिद्ध वकील लावला. पण तो चालला नाही. उपळा खून प्रकरण बोर्डावर आलं होतं. त्याप्रकरणी त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 50 हजर रुपयांचं दंड ठोठावण्यात आलं. पुढे गुलबर्ग्याला हायकोर्टात त्याचे केसेस चालले. त्यामुळे 14 महिने उस्मानाबादच्या जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला गुलबर्गा येथील जेलमध्ये हलवण्यात आलं.
टेके दांपत्य खूनप्रकरणात फाशीची शिक्षा
तोपर्यंत हैदरची प्रकृती खूप खालावली होती. गुलबर्गा हायकोर्टाने देखील त्याला ईट येथील टेके दाम्पत्यांच्या खूनप्रकरणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हे ऐकून प्रकृती खालावलेल्या हैदरने मान टाकून दिली. उस्मानाबाद आणि गुलबर्गच्या कोर्टात त्याला अनेक खटल्यात शिक्षा झाली. याविरोधात त्याने वरील कोर्टात अपील केली, ज्याला खूप वेळ गेलं. हैद्राबादमध्ये देखील खटले दाखल असल्याने त्याला हैद्राबादच्या चांचलगुंडा जेलमध्ये हलवण्यात आलं. या तिन्ही जेलमध्ये असताना त्याने डायरी लिहायची सोडली नाही. तसंच त्याने जेलमध्ये कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात केली.
सर्वोच्च न्यायालयाने हैदरविरुद्धचे सर्व खटले केले रद्द
3 वर्ष 11 महिने 3 वेगवेगळ्या जेलमध्ये राहिलेल्या हैदरला अंतरिम जामीन मिळाला. यादरम्यान त्याने शिक्षा झालेल्या कोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. स्वतः कायद्याची पदवी घेतली आणि खटले लढायला सुरुवात केली. नशीब बलवत्तर म्हणून अखेर जून 1954 साली सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरील सर्व खटले काढून घेतले. यात राजप्रमुख किंवा गव्हर्नर म्हणून नेमलेल्या निजामाने त्याला बरीच मदत केली. वैद्यकीय कारण देत त्याला सेवेतून कार्यमुक्त केले. त्याला 58 रुपये पेन्शन मंजूर करण्यात आली.
वयाच्या 58 व्या वर्षी निधन
कोर्टातून निर्दोष सुटल्यानंतर 1955 पासून निजामच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1967 सालापर्यंत निजामाचा पी.ए म्हणून त्याने काम केले. वयाच्याबाबतीत तो कमनशिबी ठरला. 1973 साली वयाच्या 58 व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्यापूर्वी त्याने स्वतःचं आत्मचरित्र्य म्हणून ‘ ऑक्टोबर कूप’ नावाचं पुस्तक लिहलं. त्यात त्याने हैद्राबादचा मुक्तिसंग्राम लिहला आहे. आजही चिलवडीसारख्या गावात गेलात आणि विचारलं, उस्मानाबादचा कलेक्टर कोण होता? तर म्हाताऱ्या बायकोसुद्धा सहजपणे नाव घेतात, हैदरी!
ADVERTISEMENT