शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणलं जातं त्यावेळी त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटायला येतात. यावेळी संजय राऊत राजकीय घडामोडींबाबत वक्तव्य करत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रश्न कोर्टाने मुंबई पोलिसांना विचारला आहे. तसंच या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत मीडियाशी बोलतात ही पोलिसांची तक्रार
ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या या अर्जावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या वेळी संजय राऊत यांना न्यायालयात आणण्यात येतं. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावरही त्यांना न्यायालयात आणण्यात येतं. त्यावेळी संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतात. याबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला होता.
कुलाबा पोलिसांतर्फे विशेष न्यायालयाकडे संजय राऊत यांच्या बोलण्याविषयी, त्यांना भेटायला येणाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र कोर्टाने यामध्ये तुम्हाला नेमकी अडचण काय आहे? असा प्रश्न विचारला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पोलिसांना हा सवाल केला आहे.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
संजय राऊत हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असल्याचं आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. यावर कोर्टाने असं म्हटलं आहे की संजय राऊत जे बोलतात त्यामुळे ईडीच्या तपासात अडथळे येत असतील तर त्याबाबत ईडीने तक्रार करावी. मात्र संजय राऊत राजकीय मुद्द्यांवर बोलले तर त्याला काहीही हरकत नसावी. हे प्रकरण राजकीय सुडबुद्धीतून दाखल करण्यात आलेलं नाही असा ईडीचा दावा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राजकीय वक्तव्य केल्यास अडचण काय? असा प्रश्न कोर्टाने मुंबई पोलिसांना विचारला आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलैला अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. १ हजार कोटींच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT