मुंबईत रविवारी सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला. मुंबईतील अनेक भागांत बत्ती गुल झाल्यानं नागरिकही हैराण झाले. मात्र, वीज कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तासाभरात मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत झाला. वीज खंडित झाल्याचा परिणाम लोकल रेल्वे सेवेवरही झाला.
ADVERTISEMENT
मुंबईत रविवारी सकाळी सायन, माटुंगा, परेल, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, चर्चगेट, चेंबूरमधील काही भाग, वांद्रे आणि कुर्ला या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याचं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेकडून तशी माहिती देण्यात आली होती. त्याचबरोबर तक्रारीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मात्र, अचानक इतक्या मोठ्या भागात बत्ती गुल झाल्यानं पुन्हा 2020 मधील घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती होती. मात्र, काही वेळानंतर सर्वच भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला.
काही काळासाठी झालेल्या ‘बत्ती गुल’बद्दल वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीने (BEST Electric Supply) ट्विट हॅण्डलवरून याची माहिती दिली. मुलुंड ट्रॉम्बे येथील एमएसईबीच्या ट्रान्समिशन लाईनवरील विद्युत प्रवाह खंडित झाल्यानं मुंबईतील बहुतांश भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र वीज पुरवठा पुन्हा पुर्वीप्रमाणे सुरळीत सुरू करण्यात आला आहे”, असं बेस्ट ईलेक्ट्रिसिटीने म्हटलं आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यानं सकाळी 9:42 ते 10:45 या काळात लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. चर्चगेट आणि अंधेरी दरम्यानची सेवा विस्कळीत झाली होती. मुंबई सेंट्रलकडे येणारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस ही गाडी 30 मिनिटं उशिराने दाखल झाली. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने 50 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर 140 रेल्वे एक्स्प्रेस गाड्यांना विलंबाने धावत आहेत.
ADVERTISEMENT