अवघी मुंबई गणरायाच्या स्वागतात गुंतलेली असतानाच काळजाचा थरकाप उडवणारी घटना साकीनाका परिसरात घडली. या घटनेतील पीडितेचा शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना भावना अनावर झाल्या. यावेळी त्यांनी सरकारवरही संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती कळताच चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसंच पीडितेची माफीही मागितली.
‘साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला… कुठल्या वेदनेतून गेली असशील; याची कल्पनाही करवत नाही, पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला’, अशा भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या.
चित्रा वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘मी आता निशब्द झाले आहे. माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्दच नाहीत. एका महिलेवर ज्या पद्धतीने अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी बोलले, मी पीडितेला बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले आहेत. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. हे अत्याचार थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले’, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
‘गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाला. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने स्वतःला संपवून टाकलं.’
‘साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती. आपण काही करू शकलो नाही आहोत. ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही. राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही’, असं टीकास्त्र चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर डागलं.
महिला अॅट्रोसिटी कायदा करा
‘अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा. ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे; तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा. त्यासाठी कमिट्या स्थापन करा’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT