काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या एका ट्विटवरून भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ट्विटरवरच भिडले. चंद्रकांत पाटील आणि नाना पटोले यांनी हिंदुत्वावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडवत सवाल केले.
ADVERTISEMENT
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी काल वसंच पंचमीनिमित्त एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एक आठवण सांगितली होती. पण त्यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ही तीच काँग्रेस आहे का, असा सवाल केलाय. त्यावर पटोले यांनीही प्रत्यूत्तर दिलंय.
प्रियंका गांधी ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
प्रियंका गांधी वसंत पंचमीच्या शुभेच्छा देताना आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘वसंत पंचमीनिमित्त आमची आजी इंदिराजी शाळेत जाताना आम्हा दोघांच्या खिशात पिवळा रुमाल टाकायची. आजही त्यांची हीच परंपरा जपत माझी आई मोहरीची फुलं मागवून घरात वसंत पंचमी साजरी करते. विद्येची देवता सरस्वती सर्वांचं कल्याण करो. तुम्हा सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा.’
चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना टोला
चंद्रकांत पाटील यांनी प्रियंका गांधींना टोला लगावत नाना पटोले यांना सवाल केलाय. चंद्रकांत पाटील लिहितात, ‘अरे देशानं हे काय बघितलं? ही तीच काँग्रेस आहे का, जी भगव्या दहशतवादाबद्दल बोलायची? ज्यांनी प्रभू रामाला काल्पनिक ठरवून मंदिर उभारणीविरोधात आपली वकीलांची फौज उभारली होती? तसं देशाला चांगलं ठाऊक आहे की हे निवडणुकीपुरती हिंदू असलेली काँग्रेस आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नाना पटोले हे खरंय का असा सवाल केलाय.
हेही वाचाः किरण बेदींना पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदावरून हटवलं, हे आहे कारण
नाना पटोले यांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्यूत्तर
चंद्रकांत पाटलांच्या याच ट्विटला नाना पटोले यांनीही प्रत्यूत्तर दिलंय. प्रियंका गांधींना टॅग करून ते लिहितात, ‘राम मंदिराचं कुलुप तोडणारे प्रियंका गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी हे होते. हिंदू धर्म आमच्या रक्तात भिनलाय. कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. राम मंदिराच्या नावानं पैसा गोळा करणाऱ्यांनो काही वर्षांपूर्वीही श्रीरामाच्या नावानं वर्गणी जमवली होती, त्याचं काय केलं होतं, एवढंच सांगा.’ असा उलटसवाल नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटलांना केलाय.
नाना पटोलेंच्या या उलट प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी अजून कोणतंच प्रत्यूत्तर दिलं नाही.
हेही वाचाः मुंबईचा हा वॉर्ड आहे कोरोनाचा हॉटस्पॉट, BMC कडून कडक नियम जाहीर
ADVERTISEMENT