मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत आहेत असे आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझे आरोप राज्य सरकारवर नाही तर केंद्र सरकारवर होते असं सांगत नाना पटोले यांनी माध्यमांवर या प्रकरणाचं खापर फोडलं आहे. लोणावळ्यात जे मी बोललो ते केंद्राबाबत होती. मी आयबीचा रिपोर्ट म्हटलं होतं. तसंच वाळू सरकण्याबाबत बोललो तेही भाजपबद्दल होतं. भाजपची अस्वस्थता वाढली आहे. सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहे. मात्र सध्या भाजपचा तोल सुटला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची चुकीची वक्तव्य होतं.
ADVERTISEMENT
नाना पटोलेंनी काय म्हटलं होतं?
‘प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी सोनिया गांधींना भेटायला गेलो त्या आजारी असल्यामुळे भेट होणार नाही अशी माहिती मिळाली. मी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना भेटलो आणि बाहेर पडलो परंतु मला पुन्हा फोन आला आणि सोनिया गांधी यांची भेट झाली त्यांनी मला सांगितलं आहे की महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. त्यामुळेच मी स्वबळाबाबत बोललो आहे. परंतु मला हे सुखाने राहू देणार नाहीत. त्यांच्याकडे गृहखाते आहे. मुख्यमंत्रीपद पण आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत परंतु ते त्यांच्या जवळ आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहतेय हे त्यांना माहिती आहे. आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सकाळी 9 वाजता देण्याचे आदेश आयबीला आहे. मी कुठं सभा घेतली, कुठले दौरे केली याची सगळी माहिती असते. मी रात्री 3 वाजता सभा घेतली याची माहिती मीडियाला नाही मात्र यांना पोहचलेली असते. कारण त्यांच्याजवळ ती व्यवस्था आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरखायला लागली आहे हे त्यांना कळायला लागलं आहे. ते कुठं ना कुठं आपल्याला पिंजऱ्यात आणायचं प्रयत्न करत आहेत. आम्हांला कुठं टाकायचं आहे तिथं टाका, जेल मध्ये टाका, इंदिरा गांधींना टाकलंच की यांनी जेल मध्ये त्यामुळे काय घडलं काही झालं नाही.’
असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. मात्र आता त्यावर स्पष्टीकरण देत त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे असं म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले नाना पटोले?
माझ्या वक्तव्याला महत्त्व आलं याचाच अर्थ हा होतो की काँग्रेसचं महत्त्व महाराष्ट्रात वाढतं आहे. रविवारी शरद पवार यांनीही म्हटलं आहे की पक्ष वाढवणं आणि सरकार चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्ष वाढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी जे कामाला लागा असं कार्यकर्त्यांना सांगितलं त्याचं मी स्वागतच केलं. मी जनतेची लढाई लढतो आहे, रात्री ३ वाजेपर्यंत माझी आणि काँग्रेस पक्षाची वाट बघत असतील तर माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी चांगलीच गोष्ट आहे. भाजपच्या पायाखालची वाळू यामुळे सरकणं साहजिक आहे.
ADVERTISEMENT