केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात पहायला मिळत आहेत. संपूर्ण राज्यात आज शिवसैनिकांनी रस्त्यावर येऊन नारायण राणेंविरोधात निदर्शन केली. मुंबईत जुहू येथील नारायण राणेंच्या निवासस्थानी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त अनेक भागांत शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या पुतळ्याला जोडे मारले तर काही ठिकाणी भाजपची कार्यालयं तोडण्यात आली. नाशिक, पुणे, नागपूर अशा विविध ठिकाणी नारायण राणेंविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला असून आजचा दिवस राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाने गाजताना दिसत आहे. जाणून घेऊया राज्यात आज सकाळपासून संघर्षाची ठिणगी कशी पडत गेली.
मुंबईच्या दादर परिसरात स्थानिक शिवसेना नगरसेवक आणि युवासेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंचा कोंबडीचोर असा उल्लेख करत मोठं पोस्टर लावलं. महाड येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना नारायण राणेंनी…मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे शिवसैनिक चांगलेच भडकलेले पहायला मिळाले.
यानंतर ठिणगी पडली ती नाशिकमध्ये. राणेंच्या वक्तव्याविरोधात स्थानिक शिवसेना नेत्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नाशिक पोलीसांनीही ही तक्रार दाखल करुन घेत नारायण राणेंवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केलं. याचवेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नाशिकमधलं भाजपचं कार्यालय फोडलं.
एकीकडे नाशिकमध्ये नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील जुहू भागात राणेंच्या बंगल्याबाहेर पोलिसांनी लगेच बंदोबस्त वाढवला. या भागात शिवसैनिक जमायला लागले आणि त्यांनी नारायण राणेंविरुद्ध घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कालांतराने या भागात भाजप कार्यकर्ते आणि नारायण राणे समर्थकही जमा झाले. ज्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं…ज्यानंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
यानंतर हा वाद आणि संघर्ष संपूर्ण राज्यभर पसरतच गेला. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेत, नारायण राणेंना हॉस्पिटलमध्ये भरती करुन शॉक देण्याची गरज आहे असं म्हटलं. तर बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही राणेंच्या वक्तव्यावर टीका केली. राणेंना सत्तेचा माज आला आहे. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर कोकणातील घरात शिरुन त्यांचा माज उतरवू अशी प्रतिक्रीया संजय गायकवाड यांनी दिली.
Sharjeel Usmani ला सोडून देता आणि राणेंना पकडण्यासाठी पोलीस? हा कुठला न्याय-फडणवीस
दुसरीकडे सांगलीतही भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या ऑफिसबाहेर लावलेल्या पोस्टरवर नारायण राणेंच्या फोटोवर शिवसैनिकांनी काळं फासलं. तर सांगलीमध्येच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या घेत राणेंविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच राणेंच्या पुतळ्याला बांगड्या घालत आणि पोस्टर्सना जोड्याने मारहाण करत शिवसैनिकांनी सांगलीत आपला निषेध व्यक्त केला.
तिकडे बीडमध्येही नारायण राणेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. अमरावतीमध्येही संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर लावलेली पोस्टर जाळत आपला राग व्यक्त केला. सोलापुरातही शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या पोस्टर्सला चपलांचा हार घालत आपला रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. कोल्हापुरातही शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला आग लावली.
दुसरीकडे नारायण राणेंचा एकेकाळचा गड मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या वादाचे पडसाद पहायला मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा येऊ देणार नाही असा इशारा स्थानिक शिवसेना नेत्यांनी दिला. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणेंचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न केला, परंतू पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना रोखलं. अकोल्यातही शिवसैनिकांनी गाढवाला नारायण राणेंचा चेहरा लावत त्याची धिंड काढत घोषणाबाजी केली. तर तिकडे जळगावात शिवसैनिकांनी या पुढे जात डुकरांच्या अंगावर नारायण राणेंचा फोटो लावत आपला निषेध व्यक्त केला.
दुसरीकडे नागपुरातही युवा सेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी करत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. वाशिम आणि बुलढाण्यातही शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत राणेंचा पुतळा पेटवून दिला. सिंधुदुर्गातही शिवसैनिक रस्त्यावर येऊन आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनाही पाचारण केलं.
बारामतीमध्येही शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी नारायण राणेंच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं. साताऱ्यातही शिवसेना कार्यकर्ते राणेंच्या वक्तव्याविरुद्ध रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले. धुळ्यात शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून घोषणाबाजी केली. जळगावातही कालांतराने शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात कोंबड्या फेकल्या. ज्याला भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिलं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे या भागात तणावाचं वातावरण पहायला मिळालं.
दुसरीकडे धुळ्यात शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असताना त्यांनी नारायण राणेंच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा नगरपालिकेजवळ आली असता भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडले. ज्यातून या भागात दगडफेकही झाली. पोलिसांनी यात वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात नारायण राणेंविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले असताना सोलापुरात राणे समर्थक सुनील खटके यांनीही शिवसेनेला इशारा दिला. आम्ही राणेंच्या आदेशाची वाट पाहत आहोत, आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ असा इशारा खटके यांनी दिला आहे.
दरम्यान नारायण राणेंविरुद्ध शिवसैनिकांचा हा आक्रोश चंद्रपूर, बीड, बुलढाणा या भागात कायम दिसून आला.
Varun Sardesai: ‘उंदराच्या बिळाखाली, राणेंच्या घराखाली येऊन दाखवलं, वरुण सरदेसाईंचं आव्हान
दुपारी नागपुरातही शिवसेना कार्यकर्त्यांनी नाराणय राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. तर सांगलीत ज्या भाजप कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळं फासलं त्या पोस्टरला भाजप आमदार सुधीर गाडगीळ आणि दुधाचा अभिषेक करत शुद्धीकरण केलं. हिंगोलीतही शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरत राणेंविरुद्ध घोषणाबाजी केली. उस्मानाबाद, यवतमाळमध्येही नाराज शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं केली.
दरम्यान दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक केली.
ADVERTISEMENT