राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत असं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हे भाष्य केलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट नेमकी कशासाठी होती यावरून विविध अंदाज बांधले जाऊ लागले. राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं. यावेळी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नवाब मलिक यांनी हे उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे कधीही एकत्र येणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेलं राष्ट्रीयत्व आणि आमच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असलेलं राष्ट्रीयत्व या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आम्हाला हेदेखील माहित आहे की ईडी सारख्या तपासयंत्रणाचा वापर भाजपकडून चुकीच्या पद्धतीने केला जातो आहे. मात्र आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईडीला घाबरत नाही. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत राज्याच्या घडामोडींवर काहीही चर्चा झालेली नाही.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट ही काही अचानक झालेली भेट नाही. गेल्या काही दिवसांपासूनच ही भेट ठरली होती. शऱद पवार हे नरेंद्र मोदींना सहकारी बँकांबाबत भेटणारच होते. या भेटीची काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना कल्पना आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
खरंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणं ही बाब साधीसुधी नाही. त्या भेटीचे अनेक कंगोरे असू शकतात. कारण राष्ट्रपतीपदाची निवडणूकही जवळ येते आहे. एवढंच नाही तर गेल्यावेळेस झालेल्या म्हणजेच 19 महिन्यांपूर्वी झालेल्या भेटीलाही संदर्भ आहे. महाराष्ट्रात तेव्हा भाजप राष्ट्रवादी सोबत जाणार का? अशा चर्चा त्यावेळी सुरू होत्या. कारण शिवसेना आणि भाजप दूर केले होते. त्यावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. या भेटीनंतर ती भेट थेट आज झाली आहे.
Sharad Pawar यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. नवाब मलिक यांनी सांगितलं कारण
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी करून दाखवला. त्याआधी म्हणजेच विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. एवढंच नाही तर समोर कुस्तीचं मैदान आहे पण मला पैलवानच दिसत नाही. शरद पवार यांचं राजकारण आता संपलं आहे अशी काही वाक्यं त्यांनी वारंवार वापरली होती.
या एका गोष्टीमुळे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे शरद पवार हे खूप दुखावले गेले असंही त्यावेळी बोललं गेलं आणि म्हणूनच राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नकोत अशी अट शरद पवार यांनी मोदींना घातली होती असंही त्यावेळी चर्चिलं गेलं. आता आज एक तास या दोन नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा झाली आहे. या चर्चेत सहकारी बँका हा विषय होताच. मात्र विविध चर्चाही रंगल्या होत्या. आता या चर्चांना नवाब मलिक यांनी पूर्णविराम दिला आहे.
ADVERTISEMENT