पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. विविध मुद्द्यांवरती बोलताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचाही उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. मोदींनी केलेल्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दाखला दिला आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली होती.
ADVERTISEMENT
रुपाली पाटील आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाल्या?
घराणेशाही संपवणार – मा.नरेंद्रजी मोदी साहेब
गंगाधरराव फडवणीस – मा.आमदार
शोभाताई फडवणीस – माजी मंत्री
देवेंद्र फडवणीस – उपमुख्यमंत्री
वाट पाहूया ? मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून व त्यांच्या पक्षातून सुरवात करण्याची. देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या शब्दाचा मान राखत घराणेशाहीचा वारसा लाभलेले देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील का? अशा आशयाचं ट्विट रुपाली पाटील यांनी केलं आहे. रुपाली पाटील यांनी ट्विट करत थेट पंतप्रधानांनाच आवाहन दिले आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
“आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये घराणेशाही कुणीही आणू शकत नाही. लोकशाहीमध्ये जर जनतेनं त्यांना निवडून दिलं तर ते निवडून येऊ शकतात. जर कुणाचं काम चांगलं असेल, तर लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे.”
“पंडित जवाहरलाल नेहरूंची कारकीर्द आपण बघितली. त्याच्यानंतर इंदिरा गांधींची कारकीर्द आपण बघितली. एक पोलादी स्त्री म्हणून त्या संपूर्ण जगात लोकप्रिय झालेल्या आपण बघितल्या. त्यानंतरच्या काळात आपण राजीव गांधींची कारकीर्द बघितली. मिस्टर क्लिन आणि संगणक युग आणण्याचं काम त्यांनी केलं”, असं अजित पवार म्हणाले.
“हे जे घराणेशाही… घराणेशाही म्हटलं जातं, ज्यांच्यामध्ये कुवत नाही. ताकद नाही. वक्तृत्व नाही, नेतृत्व नाही अशानाच तुम्ही जर बळजबरीने त्या पदावर बसवलं, तर तुम्ही त्याला घराणेशाही म्हणून शकता. पण एखाद्याच्या घरात जन्माला आलेली पुढची पिढी जर कर्तृत्वावान असेल, लोकशाही पद्धतीने त्यांच्या भागातील मतदारांनी त्यांना आमदार किंवा खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे. हे माझं स्पष्ट मत आहे”, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी मोदींना दिलं.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले?
“काही विषयावर मी आज चर्चा करू इच्छितो. चर्चा अनेक विषयांवर होऊ शकते, पण वेळेच्या मर्यादेअभावी मी दोन विषयांवर बोलू इच्छितो. एक आहे भ्रष्ट्राचार. दुसरा घराणेशाही. लोक गरिबीशी संघर्ष करत आहेत. एकीकडे लोकांना राहण्यासाठी घर नाही, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा पैसा ठेवायला जागा नाही. हे चांगलं नाही.”
“आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीशी लढायचं आहे. मागील आठ वर्षात थेट अनुदानाद्वारे, आधार, मोबाईल, या आधुनिक यंत्रणांचा वापर करून जे करोडो रुपये चुकीच्या हातात जात होते, ते वाचवून देशाच्या भल्यासाठी वापरण्यात आम्ही यशस्वी झालोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
ADVERTISEMENT