राकेश गुढेकर, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्याची आठवण करुन देत रामदासभाईंना डिवचलं आहे. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीमध्ये जाहीर सभा घेतली होती, त्यासभेमध्ये रामदास कदमांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंवरती टीका केली होती. आता खासदार सुनील तटकरेंनी रामदास कदमांना सुनावले आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
”रामदास भाईंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करावं याची मला कीव येते. त्यांचा राजकीय इतिहास मधल्या कालावधीत कुठल्या पक्षासाठी कुठली वाटचाल करायची हा होता. मी व्यक्तीगत टीकाटिपण्णीत जाऊ इच्छित नाही, पण उद्धवजींनी महाविकास आघाडी करण्याचा जो काही निर्णय घेतला, त्या निर्णयामागे महाराष्ट्राचं व्यापक हित लक्षामध्ये घेतलं होतं. आणि मला आठवतंय ज्या वेळी भाजपा आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला याच रामदास भाईंची संभावना आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास भाईंचं स्थान काय हे कल्याण-डोंबिवलीच्या सभेत जाहीररीत्या सांगितलं होतं, त्यामुळे रामदास भाई आम्हाला अधिक बोलायला लावू नका” असे सुनील तटकरे म्हणाले आहेत.
पुढे सुनील तटकरे म्हणाले ”जी भूमिका राजकिय सोयीची असेल ती तुम्ही जरूर घ्या, पण आदरणीय शरद पवार यांना दोष देण्याचं प्रयत्न करू नका, तुमच्याही व्यक्तिगत जीवनात तुम्ही पहिल्यांदा आमदार झाल्यावर पवार साहेबांनी तुम्हाला केलेली मदत तुम्ही विसरू नये, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे.”
ADVERTISEMENT