कुँवरचंद मंडले, नांदेड
ADVERTISEMENT
महाराष्ट्र (MAHARASHTRA) विधानसभा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 54 आमदार निवडून आले होते. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी कोरोना संसर्गाने निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती.
ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार संख्या ही 53 झाली होती. मात्र, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागला असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची काम करण्याची पध्दत आपल्याला आवडते. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ते आपल्याला मदत देखील करतील म्हणूनच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत अशी माहिती श्यामसुंदर शिंदे यांनी आज (27 जून) दिली आहे.
सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली-शरद पवार
आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी जलसंपदामंत्री जयंत पाटील हे चहापानासाठी आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, 2019 च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. ते जरी शेतकरी कामगार पक्षातून निवडून आले असले तरीही त्यांनी आपला पाठिंबा हा भाजपला जाहीर केला होता. मात्र, फडणवीस यांचं 72 तासांचं सरकार जाताच श्यामसुंदर शिंदे यांनी तात्काळ यू-टर्न घेत महाविकास आघाडीला आपला पाठिंबा असल्याचं तेव्हा म्हटलं होतं.
दरम्यान, असं असलं तरी ते शेकापमध्येच होते. मात्र, आता शेकापला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या सत्तेत असणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या मतदारासंघाची विकासकामं वेगाने व्हावीत यासाठी आपण राष्ट्रवादीत जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
2019 निवडणुक शिवसेना-भाजपने युतीत लढली होती. अशावेळी लोहा मतदारसंघात हा भाजपच्या वाट्याला यावा यासाठी प्रताप पाटील-चिखलीकर यांनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र, शिवसेनेने अखेरपर्यंत ही जागा सोडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेने येथून मुक्तेश्वर धोंडगेंना उमेदवारी देऊ केली होती.
Chitra Wagh: राष्ट्रवादी आता शरद पवारांच्या विचाराची राहिली नाही: चित्रा वाघ
दुसरीकडे शिवसेना उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून प्रताप चिखलीकर यांनी श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. त्यांना शेकापकडून उमेदवारी जरी मिळाली तरी खऱ्या अर्थाने इथे प्रताप चिखलीकरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान, या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल 60 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. पण पुढच्या काळात राज्यातील सत्तेची समीकरणंच बदलून गेली. अखेर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण होत असताना शेकाप आमदार श्यामसु्ंदर शिंदे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT