राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांच्या मुद्द्यावर मागण्या मांडत असताना ठाकरे यांनी कोरोनाच्या कालखंडात कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? एक हजारापेक्षा जास्त इमारती सील
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होते आहे. अमरावती, यवतमाळ यासारख्या भागांमध्ये स्थानिक जिल्हा प्रशसनाने लॉकडाउन जाहीर केला असून मुंबईतील काही भागांमध्येही कोवीडची परिस्थिती चिंताजनक आहे. ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यामुळे गेल्या काही दिवसांत १ हजार सोसायटी सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पारंपरिक १० ते ५ या मानसिकतेत बदल होणं गरजेचं असून केंद्राने यासाठी पुढाकार घेऊन राष्ट्रीय धोरण आखावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेने सील केलेल्या इमारतींची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. कोरोना रूग्ण वाढत असल्याने जे नवे निर्देश मुंबई महापालिकेने लागू केले आहेत त्यानुसार या इमारती सील करण्यात आल्या आहेत. ज्या इमारती सील करण्यात आल्या आहेत त्या भागातल्या नागरिकांनी अधिकची खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी असंही आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. जे नागरिक कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT