कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने नाशिकमध्ये मंगळवार रात्रीपासून निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. सगळे व्यवहार सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत करण्याची मुभा देण्यात आली आहे. चार तालुक्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर १५ मार्चनंतर लग्न सोहळ्यांना आणि मंगल कार्यालयांमध्ये परवानगी देण्यात आलेली नाही. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
पालकमंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं अवघड असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलं. तसंच नाशिककर कोरोना नियम पाळत नाहीत असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं. नाशिक जिल्हा आणि मालेगावातील सर्व शाळा आणि क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे असंही या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
नाशिक, नांदगाव, मालेगाव आणि निफाड या चार तालुक्यांमधल्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीनंतर झाला आहे. जीवनावश्यक वस्तू, दुकाने आणि सेवा वगळता सगळी दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
१५ मार्च नंतरच्या विवाह सोहळ्यांना मंगल कार्यालयं आणि लॉन्सवर परवानगी देण्यात आलेली नाही. १५ मार्चनंतर लग्न सोहळा घरीच २५ ते ३० जणांच्या उपस्थित करावा असंही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. एका महिन्यात नाशिकमध्ये चौपट रूग्ण वाढले आहेत त्यामुळे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधला मृत्यू दर नियंत्रणात आहे. मात्र वाढत्या रूग्णांमुळे परिस्थिती गंभीर होते आहे असंही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT