नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण या संपूर्ण प्रकरणांचं कनेक्शन आता थेट तिहार जेलशी असल्याचं समोर येत आहे.
ADVERTISEMENT
अँटेलियाबाहेर जी संशयित कार सापडली होती ती जैश-उल-हिंदने पार्क केल्याचं सुरुवातीला एका टेलिग्राम पोस्टरच्या माध्यमातून समोर आलं होतं. हेच टेलिग्राम चॅनल राजधानी दिल्लीतील तिहार जेलमध्ये बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कारण ज्या नंबरवरुन हे पोस्टर आलं होतं तो नंबर सुरक्षा एजन्सींनी ट्रॅक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
म्हणजेच जैश-उल-हिंद नावाने जे बॅनर सुरुवातीला तयार करण्यात आलं होतं ते तिहारमधूनच तयार झाल्याचं समोर आल्याने या प्रकरणातील गुंता हा अधिकच वाढला आहे.
पहिल्यांदा जैश-उल-हिंदच्या नावे जे पोस्टर समोर आलं होतं त्याबाबत दुसऱ्याच दिवशी जैश-उल-हिंदने हे पोस्टर खोटं असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी असंही म्हटलं होतं की, आमच्या नावे खोटं टेलिग्राम चॅनल बनविण्यात आलं आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त हे सर्वात आधी ‘मुंबई तक’ने दिलं होतं
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
25 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी याच्या मुंबईतील अँटेलिया घराबाहेर संशयित स्कॉर्पिओ कार सापडली होती. ज्यामध्ये काही जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे या सर्वत्र खळबळ उडाली होती.
दरम्यान, 28 फेब्रुवारी 2021 रोजी अंबानींच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणी अशी माहिती समोर आली की, संशयित गाडीबाबत जैश-उल-हिंद या नावाच्या एका संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारल्याचं त्यावेळी सांगितलं गेलं.
पहिल्या दिवशी जे बॅनर समोर आलं होतं. त्यात असं म्हटल होतं की, ‘थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा… तुम्ही तेव्हा देखील काहीही करु शकला नव्हता जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखालून दिल्लीत तुम्हाला ‘हिट’ केलं होतं. तुम्ही मोसादसोबत हातमिळवणी केली पण काहीही झालं नाही. तुम्ही लोकं वाईट पद्धतीने अपयशी ठरला आहात आणि पुढे देखील तुम्हाला यश मिळणार नाही.’
याच मेसेजमध्ये पुढे असं लिहलं आहे की, (अम्बानिज साठी) ‘तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा, जे तुम्हाला आधी सांगितलं होतं.’ यामुळे या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी संघटनेचाच हात आहे असं चित्र निर्माण झालं होतं.
‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी
‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 मार्च 2021 रोजी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने आपण मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवलं नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या जैश-उल-हिंद संघटनेचा एक बॅनर शेअर केला होता.
त्या बॅनरमध्ये असं म्हटलं होतं की, त्यांनी अंबानींना कोणतीही धमकी दिलेली नाही. त्यामुळे मीडियामध्ये आमच्या नावे जे बॅनर फिरतं आहे ते खोटं आहे.
पाहा त्या बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलं होतं.
‘आज सकाळी आम्ही पाहिलं की, भारतीय मीडियामध्ये एक वृत्त सुरु होतं की, आम्ही ‘जैश-उल-हिंद’ने भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील जी कार पार्क केली आहे त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हाला जैश-उल-हिंदच्या नावाने सुरु असणाऱ्या टेलीग्राम अकाउंटबाबत देखील माहिती पडलं आहे.’
‘ज्यामध्ये याच घटनेचा उल्लेख करत एक बॅनर जारी करण्यात आलं आहे. पण आता आम्ही आमच्या या पोस्टरद्वारे स्पष्ट करु इच्छितो की, ‘जैश-उल-हिंद’चा या घटनेशी काहीही संबंध नाही. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील घटना, कथित टेलीग्राम अकाउंट आणि पोस्टर यांचा जैश-उल-हिंदचा काहीही संबंध नाही. आमचं खोटं पोस्टर बनविणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.’
‘जैश-उल-हिंद हे कधीही क्रुफांकडून पैसे घेत नाही. आमची लढाई भारतीय व्यापार जगतातील व्यक्तींशी नाही. आमची लढाई ही भाजप आणि आरएसएसविरुद्ध आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या कृत्यांच्याविरोधात भारतातील निरपराध मुस्लिमांसाठी लढा देत आहोत. आम्ही शरीयतसाठी लढत आहोत पैशांसाठी नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीविरुद्ध लढत आहोत अंबानींशी नाही.’
त्यातच आता जैश-उल-हिंदच्या नावे टेलिग्राम चॅनल तिहारमधून बनविल्याचे समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT