त्रिपुरात काहीही घडलं नाही, सोशल मीडियावरचं ‘ते’ वृत्त चुकीचं; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

मुंबई तक

• 02:24 AM • 14 Nov 2021

त्रिपुरातल्या कथित घटनेवरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे. अशात आता या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं आहे. काय म्हटलं आहे केंद्रीय […]

Mumbaitak
follow google news

त्रिपुरातल्या कथित घटनेवरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे. अशात आता या सगळ्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने?

त्रिपुरा या ठिकाणी मशिद बांधकामाला कोणतंही नुकसान पोहचलेलं नाही. असा कोणताही प्रकार त्रिपुरात घडलेला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मशीद पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र ही अफवा आहे आणि पूर्णपणे चुकीची माहिती आहे. दर्गा बाजार परिसरातल्या मशिदीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरू असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केलं. हे सगळं चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे अशी आग्रही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड, मालेगाव, वाशिम या शहरांमध्ये तोडफोड आणि वादावादीच्या घटना घडल्या. अमरावतीमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जाते आहे. आत्तापर्यंत 100 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालेगावमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्या 18 जणांना अटक करण्यात आली आहेत. तर नांदेडमध्ये पाच जणांना गजाआड करण्यात आलं आहे. अमरावतीत दहाहून जास्त लोकांवर कारवाई झाली आहे. तसंच अमरावतीत कर्फ्यूही लावण्यात आला आहे आणि इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

वाशिममधल्या बंदलाही हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

अचानक दगडफेक सुरु झाल्यानंतर दोन्हीकडील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र, या धुमश्चक्रीत समाजकंटकांनी काही दुकानं पेटवून दिली. सध्या अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून, वातावरण तणावपूर्ण आहे.

    follow whatsapp