अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे दापोलीत वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला असून पोलीस या प्रकरणात किरीट सोमय्यांना बंदोबस्तात मुंबईत सोडण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
दरम्यान त्याआधी दापोलीत दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी थेट शिवसेनेला आव्हान दिलं. “आम्हाला सांगण्यात आलं होतं की दापोलीत पाय ठेवायला देणार नाही. पाय सोडा मागचा ताफा पाहा अख्खं शरीर घेऊन दापोलीत आम्ही आलेलो आहोत. मी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत सांगितलं होतं. आम्हाला थांबवण्याचं काम ठाकरेंना बापजन्मात जमणार नाही. दापोलीत सोमय्यांच्या निमीत्ताने न भूतो न भविष्यती असा दौरा झालेला पहायला मिळतोय. उद्या जे चित्र बदलणार आहे त्याची मुहूर्तमेढ आपण आज केली आहे”, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला.
हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा – अनिल परबांचं किरीट सोमय्यांना आव्हान
अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर जाण्यासाठी दापोली पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर किरीट सोमय्यांसह निलेश राणे आणि भाजप कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. यावेळी रत्नागिरीच्या पोलीस अधिक्षकांनीही सोमय्या यांच्याशी बातचीत करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जागेवरुन हलणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आता कुठपर्यंत उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोमय्यांना हातोडा घेऊ द्या, फावडं घेऊ द्या; आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही – विनायक राऊत
ADVERTISEMENT