भारत हा फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. तसंच त्यात महाराष्ट्र ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. अशात जो माणूस गुंतवणूक करतो त्याचा अधिकार हा गुंतवणूकदाराचाही असतो असं म्हणत नितीन गडकरी यांनी प्रकल्प राज्याबाहेर का जात आहेत त्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. मुंबईत इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये नितीन गडकरींची उपस्थिती होती. त्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेले? हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
काय म्हणाले नितीन गडकरी?
महाराष्ट्रात मिहानमध्ये फाल्कन आणि राफेल तयार केलं जातं आहे. महाराष्ट्रात विकास होतो आहे. गुजरातमध्येच प्रकल्प जावे असा दबाव केंद्राकडून टाकला जातो हे म्हणणं चुकीचं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणीही केवढा विकास झाला आहे तुम्ही पाहिलंच आहे. या शहरात मी सी लिंक आणि ५५ फ्लाय ओव्हर बांधले असंही नितीन गडकरींनी सांगितलं. प्रकल्प बाहेर जात असले तरीही महाराष्ट्राचा विकास होतो आहे. त्यावरून राजकारण करू नये असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
मुंबई दिल्ली हायवे तयार करणं हे माझं स्वप्न
मुंबईकरांना माहित आहे मी जे सांगतो ते खरं असतं. वरळी बांद्रा सी लिंक तयार करणं आणि तो वसई विरार पर्यंत नेणं हे माझं स्वप्न होतं. माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. पुण्यात आम्ही एक प्रयोग करतो आहे खाली रस्ता, वरती ब्रिज त्यावर मेट्रो असा प्रयोग चेन्नईतही करतो आहे. सी लिंक मुंबई दिल्ली हायवेशी जोडण्याचा माझा मानस आहे. मुंबईत बसायचं कॉफी प्यायची आणि पुढच्या १२ तासात दिल्लीत पोहचायचं असा माझा मानस आहे.
पुण्याहून नागपूरला जाणारा महामार्ग तयार होणार
पुण्याहून नागपूरला जाणारा महामार्गही आम्ही तयार करतो आहोत त्यामुळे हे अंतर ११ वरून ७ तासांवर येईल असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. पालखी मार्ग तयार होतो आहे जो देहू आळंदीमध्ये होतो आहे. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांवर आम्ही काम करतोय त्यामुळे राज्यात गुंतवणूक येणार असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT