बॉम्बे हायकोर्टाने बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांचा जामीन अर्ज रद्द करण्याचा ईडीचा अर्ज फेटाळला आहे. योगेश देशमुख हे नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहेत.
ADVERTISEMENT
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी एजन्सीबाबत युक्तीवाद करताना हे म्हटलं होतं की पैशांचं प्रकरण प्राथमिक दृष्ट्या देशमुख यांच्या विरोधातलं दिसतं आहे. खालच्या कोर्टाने याआधी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे अनिल सिंह यांनी हे म्हटलं आहे की आधीचा आदेशही तपासला जावा, त्यावेळच्या परिस्थितीत काही बदल झाला आहे का? हे बघावं असं म्हटलं आहे.
MRA मार्ग पोलीस ठाण्याने सप्टेंबर 2013 मध्ये NSEL विरोधात एक FIR नोंदवला होता. ही तक्रार अशी होती की गुंतवणूकदारांचे पैसे गैरव्यवहार आणि मालमत्तेच्या बाबतीत फसवणूक केली होती. या कंपनीतले काही जण अस्तित्वात नसलेले व्यापर करत असल्याचंही समोर आलं होतं.
याच प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीविरोधात ईडीने तपास सुरू केला होता. त्यावेळी ईडीला योगेश देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्यातल्या जवळच्या व्यावसायिक संबंधांची माहिती मिळाली. ज्यानंतर योगेश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही अटक झाली. 4 जूनला ईडीने आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने योगेश देशमुख यांना जामीन मंजूर केला होता.
देशमुख यांचे वकील राजीव चव्हाण आणि अनिकेत निकम यांनी ईडीच्या याचिकेच्या देखभालीबाबत मुद्दा उपस्थित केला. चव्हाण म्हणाले की, “जोपर्यंत आरोपीची जामिनावर प्रत्यक्षात सुटका होत नाही तोपर्यंत फिर्यादीला जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करता आला नसता.” योगेश देशमुख यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीन मंजूर केला होता परंतु ईडीने त्यांच्या सुटकेला स्थगिती दिली होती त्यामुळे बिल्डर योगेश देशमुख अजूनही तुरुंगात आहे.
न्यायमूर्ती एस के शिंदे यांनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादातून जाताना निरीक्षण केले की खालच्या न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले आहे की ‘तपासात कोणतीही प्रगती झाली नाही.’ शिंदे यांनी हेदेखील म्हटलं आहे की, ईडीने देशमुख यांच्या विरोधात तपासात प्रगती झाल्याची कोणतीही प्रक्रिया सादर केलेली नाही. एकीकडे तपासही होत नाही दुसरीकडे जामिनाला विरोधही करायला आहे असं कसं चालेल असं बॉम्बे हायकोर्टाने ईडीला विचारलं आहे. असं केलं तर त्याचा महत्त्वाच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यांना जामीन न देण्याच काही ठोस कारण दिसत नसल्याचंही कोर्टाने नमूद केलं आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असलेले प्रसिद्ध बिल्डर योगेश देशमुख यांना एप्रिल महिन्यात ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. याआधी ईडीने प्रताप सरनाईक यांचा जवळचा मित्र अमित चंदेललाही अटक केली होती. देशमुख यांची अटक हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचीही चर्चा झाली.
17 मार्चला ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर योगेश देशमुख यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी नोव्हेंबर 2020 मध्ये प्रताप सरनाईक आणि त्यांची मुलं विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. ईडीने त्यावेळी विहंग नाईक यांची पाच तास चौकशी केली होती.
ADVERTISEMENT