कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई शहरात आज अनेक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्स रुग्णांच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. परंतू महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सनाच या काळात अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. याविरोधात गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमधील नर्सेसनी आज रस्त्यावर येऊन आंदोलन केलं.
ADVERTISEMENT
रुग्णाला हॉस्पिटलच्या दारावर सोडणं भोवलं, BMC कडून दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई
नेस्को कोविड सेंटरवर काम करणाऱ्या शेकडो नर्सेसची प्रशासनाने जवळच्या परिसरातील रेस्ट रुम आणि म्हाडाच्या घरांमध्ये सोय केली आहे. परंतू शनिवारी रात्री नाईट ड्युटी करुन घरी जाण्यासाठी निघालेल्या नर्सेसना परतण्यासाठी बसची सुविधा दिली गेली नाही. ज्यामुळे संतापलेल्या नर्सनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी उपस्थित पत्रकारांना नर्सेसनी राहण्यासाठी केलेल्या व्यवस्थेवर होत असलेल्या गैरसोयींचा पाढा वाचून दाखवला.
म्हाडाच्या ज्या खोल्यांमध्ये नर्सेसची राहण्याची सोय केली आहे, त्या खोल्यांत सुरुवातीला ५ व्यक्तींना ठेवणार असं सांगितलं होतं. परंतू काही खोल्यांमध्ये १५ व्यक्तींची सोय केली आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पूर्ण धिंडवडे निघत आहेत. त्याचसोबत दररोज आंघोळ आणि इतर गोष्टींसाठी नर्सेसना २-२ तास थांबून रहावं लागतं. तसेच काही नर्सेसना आता म्हाडाच्या घरांमधून बाहेर काढलं जात असल्याची तक्रारही काहींनी केली. डॉक्टरांसाठी चांगली सोय असताना नर्सेसबद्दल असा दुजाभाव का असा प्रश्न विचारत नेस्को सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स ५ तास आंदोलन करत होत्या.
दरम्यान, ५ तासांच्या आंदोलनानंतर नेस्को कोविड सेंटरच्या डीन नीलम अंद्रादे यांनी नर्सेसच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. कोणत्याही नर्सेसना म्हाडाच्या घरांमधून हलवलं जाणार नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून नर्सेसना ज्या काही समस्या सोसाव्या लागत आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर नर्सेसनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
धक्कादायक ! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
ADVERTISEMENT