पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (17 एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा राग आवळला. याशिवाय त्यांनी दोन मोठ्या घोषणाही या पत्रकार परिषदेत केली आहे. पाहा या पत्रकार परिषदेत नेमकं काय-काय म्हणाले.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा!
‘आजची पत्रकार परिषद बोलविण्याचं कारण म्हणजे मला दोन घोषणा करायच्या होत्या. कसं आहे की, ते बोलले की आम्ही बोलायचं.. आम्ही बोललो की, ते बोलणार.. मला असं वाटतं की, जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला अनेक गोष्टी मी बोलीन.’
‘आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की, लोकांना वाटतंय की, हा धार्मिक विषय आहे भोंग्यांचा. माझ्या त्या दिवशीच्या भाषणामध्ये मी स्पष्ट केलं होतं की, हा धार्मिक विषय नसून हा सामाजिक विषय आहे. त्याकडे त्याच अंगाने पाहणं आवश्यक आहे.’
‘आता मला यात कल्पना नाहीए कोण व्यक्ती आहे ती परंतु इथे एक मुस्लिम पत्रकार आहे आणि ते आता आमच्या बाळा नांदगावकरांना भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की, माझं लहान मूल जेव्हा जन्माला आलं त्यानंतर या सकाळच्या अजान आणि या ज्या बांग दिल्या जायच्या म्हणे मी स्वत: मशिदीमध्ये गेलो आणि तिकडे सांगितलं की, माझं मूल लहान आहे हा तुमचा गोंगाट बंद करा.’
‘त्यामुळे हा विषय हा फक्त हिंदूंना त्रास होतोय किंवा बाकिच्यांना त्रास होतोय अशातला भाग नाहीए. त्याचा त्रास मुसलमानांना देखील होतोय आणि हा अनेक वर्ष तसाच राहिलेला विषय आहे. अनेकदा विषय निघाला पण यावर कोणी काही पुढे गेलं नाही.’
‘म्हणून मला असं वाटलं की, तुम्ही जर तिथे पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत राहा..’
‘3 तारखेला… आता त्यांचा रमजान सुरु आहे त्यामुळे आता कुठचीही गोष्ट मला करायची नाहीए. कोणाला काही सांगायचं नाहीए. परंतु जर त्यांना 3 तारखेपर्यंत ते समजलं नाही, कळलं नाही आणि या देशातील कायद्यापेक्षा, देशातील सुप्रीम कोर्टापेक्षा या देशातील न्यायव्यस्थेपेक्षा जर स्वत:चा धर्म म्हणून यांना जास्त मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं की, जशाच तसं उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.’
‘यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची सर्व बाजूने तयारी सुरु आहे. या महाराष्ट्रात किंवा देशात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नकोत. या देशातील, महाराष्ट्रातील कुठेही शांतता आम्हाला भंग करायची नाही. इच्छा देखील नाही.’
‘माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की, मुस्लिम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण त्यांना जर वाटत असेल की, नाही अजान आम्ही लाऊडस्पीकरवरुनच ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरुन ऐकाव्या लागतील.’
‘मला फक्त दोन गोष्टीची घोषणा करायची आहे त्यापैकी पहिली म्हणजे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे.’
‘दुसरी गोष्ट म्हणजे 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्यामुळे 5 तारखेला मी अयोध्येला पोहचेन तिथे दर्शन घेईन.’
Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे
‘मला हेच समजत नाहीए की, सगळ्या मशिदीवरील लाऊड स्पीकर हे अनधिकृत आहेत ते काढले जात नाही. मग आमच्या मुलांनी केलेल्या गोष्टी या अनधिकृत तुम्ही कशा काय मानता?’
‘जर ते शांतता भंग करत असतील तर अशा भोंग्यांना परमिट देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याही पलीकडे जाऊन आपण स्वत: काही समजणार आहोत की नाही? मुस्लिम समाजाला देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत. या देशापेक्षा तर यांचा धर्म काही मोठा होऊ शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय. याची त्यांना कल्पना येणं आवश्यक आहे.’
पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा
‘आमचे हात काय बांधलेले आहेत का?.. मला हेच म्हणायचं आहे की, या सगळ्यामध्ये त्यावेळेला आमच्याकडून मिरवणुका निघतात त्या मिरवणुका निघाल्यानंतर जर समजा त्याच्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचे हात काय बांधलेले नाही. दगड आम्हालाही हातात धरता येतो. समोर जे कुठचं हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात घ्यायला लावू नका.’
ADVERTISEMENT