गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी
ADVERTISEMENT
उस्मानाबादच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाघोली गावातील खडके परिवाराला चुकीचा मृतदेह हातात दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७० वर्षीय द्वारकाबाई रामचंद्र खडके यांना ४ मे रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू याच दिवशी उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला. रुग्णालयातील प्रशासनाने सर्व सोपस्कार पूर्ण करत ५ मे ला एका पीपीई किटमध्ये मृतदेह खडके कुटुंबियांच्या हातात दिला. आजींवर कोरोना वॉर्डात उपचार झाले असल्यामुळे नातेवाईकांनीही पीपीई किट न उघडता त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर पुढील धार्मिक कार्यासाठी मृतदेहाच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी आलेल्या कुटुंबियांना पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयातून फोन आला. ज्यात तुमच्या आजीचा मृतदेह घेऊन जा असं सांगण्यात आलं. हे ऐकल्यानंतर खडके कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. ५ मे रोजी जिल्हा रुग्णालयाने खडके कुटुंबियाला मृतदेह ताब्यात देताना पीपीई कीटवर त्यांचं नाव, गाव व इतर माहिती दिली होती. त्यामुळे खडके कुटुंबाने रुग्णालयात फोन करुन मृतदेहाचा फोटो आणि व्हिडीओ मागितला
रुग्णालयाने मृतदेहाचा फोटो पाहिल्यानंतर तो द्वारकाबाई खडके यांचाच असल्याचं समोर आलं. ज्यानंतर खडके कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात पोहचून पुन्हा एकदा खातरजमा करत तो मृतदेह द्वारकाबाई यांचाच असल्याची खात्री केली. खडके कुटुंबियांना दुसऱ्यांदा देण्यात आलेला द्वारकाबाईंचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता. दरम्यान द्वारकाबाई यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. द्वारकाबाई यांच्या रॅपिड अँटिजेन चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असून RTPCR चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील यांनी दिली.
दरम्यान झालेला घोळ, हा नावाचा स्टिकर बदलला गेल्यामुळे झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं. जिल्हा शासकीय रुग्णालयाने ५ मे ला खडके कुटुंबियांना दिलेला मृतदेह हा माजलगावच्या रुक्मिणी पंडीत यांचा होता. पंडीत यांना कोरोनाची लागण झाली होती. खडके कुटुंबियांना द्वारकाबाई यांचा मृतदेह सोपवताना इथेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला आणि त्यांनी रुक्मिणी पंडीत यांचा मृतदेह खडके परिवाराला दिला असं सांगितलं जातंय. पण द्वारकाबाई यांचा मृतदेह २-३ दिवस का ठेवला? खडके कुटुंबियांनी पंडीत यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले त्यामुळे आता पंडीत परिवाराला काय उत्तर देणार असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.
उस्मानाबादेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं थैमान सुरु असताना मृत्यू झालेल्या रुग्णांचे आणि अंत्यसंस्काराचे आकडे जुळत नसल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच अशा घटनांनंतर संशयाला अधिक जागा निर्माण होत असल्यामुळे या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.
१०० मार्कांचा पेपर, उस्मानाबाद जिल्ह्याने मिळवले १०१ मार्क ! लसीकरणाच्या आकडेवारीत घोळ?
ADVERTISEMENT