महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारला चिंतेत पाडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला. महाराष्ट्रातही आजच्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभराच्या काळात देशभरासह राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. अनेकांनी या विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढताना आपले प्राणही गमावले.
ADVERTISEMENT
नवीन वर्षात कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर लसीकरणाला सुरुवातही झाली. परिस्थिती नियंत्रणात येतेय असं वाटत असताना राज्यात गेल्या महिन्यांपासून रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होते आहे. राज्य सरकारने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. आज आपण राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात..
१) …तर मुंबईत अंशतः लॉकडाऊन – पालकमंत्री अस्लम शेख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबईत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्याच्या पर्यायावर चर्चा झाली आहे. गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत रुग्णवाढीचा वेग हा प्रचंड होता. नवीन वर्षात मार्च महिन्यामध्येच ती परिस्थिती ओढावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरुवातीला सरकार, रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक दंड, लग्न आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी केल्यास कारवाई असे पर्याय आजमावून पाहणार आहे. परंतू तरीही परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही तर शहरात अंशतः लॉकडाउन लावलं जाईल अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.
२) ठाणे – हॉटस्पॉट क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन
ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असले तरी,रूग्णसंख्या वाढतीच राहिली आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे.तेव्हा,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यत लॉकडाऊन कायम असल्याचे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
३) नाशिक – अंशतः लॉकडाउन, नागरिकांवर अनेक निर्बंध
शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून अंशतः लॉकडाउन जाहीर करण्यात आलंय. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये सर्व व्यवहार सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु असणार आहेत. मात्र रात्री 7 वाजेनंतर निर्बंध असणार आहे. तसेच 4 तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 15 मार्चनंतर लग्नसोहळ्यास मंगल कार्यालयात परवानगी नसेल.
४) औरंगाबाद – ११ मार्चपासून अंशतः लॉकडाउन
जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतू गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. ज्यात शनिवारी आणि रविवारी संपूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वसामान्य व्यवहार सुरू असतील. याकाळात राजकीय, सामाजिक सभा, धार्मिक स्थळं आणि कार्यक्रम, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. मात्र, यानंतर देखील रुग्ण वाढले तर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
५) नागपूर – १४ मार्चपर्यंत शहरात कडक निर्बंध
वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूर शहरातले निर्बंधही १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. ज्यात शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाउन असणार आहे. या दोन्ही दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट, खासगी ऑफिस बंद असणार आहेत.
याव्यतिरीक्त पुणे शहरातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतू अद्याप पुण्यात संचारबंदी व इतर निर्बंधाव्यतिरीक्त लॉकडाउनचा विचार करण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी अमरावती, अकोला या दोन शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला होता. ज्यानंतर जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली होती. पण यानंतर शहरात लॉकडाऊनसंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय येण्यात आलेला नाही. ३१ मार्चपर्यंत अमरावती आणि अकोल्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यवतमाळमध्येही २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. परंतू यानंतर अद्याप लॉकडाउनसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातही संध्याकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT