कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी आर्यन खानला आणि इतर ९ जणांना अटक केली होती. ही कारवाई ऑक्टोबर महिन्यात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात एकामागोमाग एक ट्विस्ट या प्रकरणात समोर येत गेले. प्रभाकर साईल हा या प्रकरणात चर्चेत आला होता कारण किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईलने काही धक्कादायक खुलासे केले होते. याच प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
प्रभाकर साईल हा आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. किरण गोसावी हा आर्यन खानला अटक केल्यानंतर जो सेल्फी काढला होता त्यानंतर चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा क्रूझ कारवाईत नेमकं काय घडलं होतं त्याचे खुलासे केले होते. किरण गोसावीने काय केलं हेदेखील समोर आणलं होतं.
काय म्हणाला होता प्रभाकर साईल जबाबात?
क्रूझवर कारवाई झाली त्यादिवशी मी किरण गोसावीच्या सोबत होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मीखालीच थांबलो होतो. गोसावी सव्वाबारा वाजता खाली आला. त्यानंतर आम्ही जाऊन फ्रँकी आणि थम्सअप घेतलं. त्यानंतर ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत समीर वानखेडे आणि त्यांचे इतर सहकारी बसले होते. तिथे त्यांना आम्ही फ्रँकी आणि कोल्ड ड्रिंक्स दिलं. त्यानंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असं सांगितलं होतं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते, ते फोटो असलेले लोक आले की मला ओळखायला त्यांनी सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला किरण गोसावीला ते सांगायचं होतं. हे सगळं साईलने सांगितलं होतं.
के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल
24 ऑक्टोबरला प्रभाकर साईलने सगळ्यात आधी मुंबई तकला मुलाखत दिली आणि गौप्यस्फोट केले. क्रूझ रेडचा जो पंचनामा झाला, त्यातला नंबर वनचा पंच विटनेस आहे प्रभाकर साईल. शिवाय किरण गोसावीचा बॉड़ीगार्ड म्हणूनही साईलने काम केलंय. याच प्रभाकर साईलने किरण गोसावी आर्यन खानचं कुणाशी तरी बोलणं करवून देत होता, हा व्हीडिओ समोर आणला. पुढे जाऊन पूजा ददलानी जी शाहरूख खानची मॅनेजर आहे, तिच्याशीच हे बोलणं करवून दिल्याचं किरण गोसावीने सांगितलं.
प्रभाकर साईलने सगळ्यात मोठा आरोप केला की, किरण गोसावी आणि सॅम डिसूझा 3 ऑक्टोबरला रात्री भेटले, आणि त्यात डीलबाबत चर्चा झाली, जी पूजा ददलानींना सांगण्यात आली. 25 कोटींची डील जी 18 कोटींमध्ये मध्ये सेटल झाली आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आणि उरलेले आपल्यात वाटायचे अशी डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला. या आरोपांनी त्याने खळबळ उडवून दिली. तसंच समीर वानखेडेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही त्याने म्हटलं होतं.24 ऑक्टोबरच्या आधी नवाब मलिक हेच आरोप करत होते. मात्र प्रभाकर साईल समोर आल्याने या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला होता.
ADVERTISEMENT