बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचे हित ठाऊक आहे असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं आहे. बीड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रूग्ण संख्या वाढते आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारल्या आलेल्या 2 लाख लसींपैकी बीडलाही पुरेशा लसी मिळाल्या पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचे हित माहित आहे. जनतेच्या हितासाठी लढण्यास आम्ही तयार आहोत असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यात 729 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 असली तरीही 30 हजार 478 रूग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने कोरोना रूग्णांसाठी अहोरात्र झटते आहे. दुसरीकडे रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे. लसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रही बंद पडली आहेत. एकूणच या प्रकरांमुळे रूग्णसंख्या वाढीला लागली आहे.
आपणास विनंती आहे की आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसींपैकी बीडला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत ही बाब खेदजनक आहे. आपण या सगळ्याकडे गांभीर्याने पाहावे आणि लवकर लसी उपलब्ध करून द्याव्यात, त्यासंबंधीची सूचना संबंधित यंत्रणेला करावी
पंकजा गोपीनाथ मुंडे
राठोडांप्रमाणे धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यायला हवा – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी रात्री उशिरा हे पत्र ट्विट केलं आहे. हे पत्र ट्विट करतानाच बीडच्या मंत्र्यांना माफियांची चिंता आहे कोरोना रूग्णांची नाही असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंना टोलाही लगावला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. याचीच प्रचिती पुन्हा या पत्रातूनही आली आहे.
ADVERTISEMENT