शस्त्रक्रीयेमधून सावरल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रीय होत असलेल्या शरद पवारांना सदाभाऊ खोत यांनी टोला लगावला आहे. बार मालकांकडून खंडणी मिळते म्हणून त्यांची बाजू घेत आहात का? असं असेल तर शेतकरी देखील या काळात संकटात आहेत आणि त्यांना यामधून बाहेर काढण्यासाठी गांजा पेरण्याची परवानगी द्यावी असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहावं अशा शब्दांत खोत यांना पवारांवर हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी हॉटेल आणि बार मालकांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांची भेट घेऊन लॉकडाउन काळात होत असलेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सवलत द्यावी अशी विनंती केली होती. ज्यानंतर पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून हॉटेल आणि बारमालकांना सवलती देण्याबद्दल विनंती केली होती. ज्यावर खोत यांनी, “या राज्यातला शेतकरी अडचणीत नाही आला का? बारा बलुतेदार, शेतमजूर, छोटे व्यवसायिक अडचणीत नाही आले का?? यांच्यासाठी पवार साहेब मदत मागणार आहेत का?
शेतकऱ्यांचंही या काळात नुकसान झालंय. त्यांनी पिकवलेला माल लॉकडाउनमुळे विकता येत नाहीये. अशा परिस्थितीत त्यांना नुकसानीमधून बाहेर काढण्यासाठी गांजा पेरण्याची परवानगी द्यावी असं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहावं”, अशा शब्दांत टोला लगावला आहे. सदाभाऊ खोत सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
तुमच्या दृष्टीने हॉटेल आणि बारमालक महत्वाचे आहेत कारण त्यांच्याकडून तुम्हाला खंडणी मिळते. परंतू शेतकऱ्याला देखील या काळात अडचणींचा सामना करावा लागतो आहे. बाजार समित्या बंद आहेत, त्याच्या शेतात पिकलेला माल त्याला लॉकडाउनमुळे बाहेर विकता येत नाहीये. सध्या राज्यात असं चित्र आहे की खरीप हंगामात शेतकऱ्याने कोणत्याही पिकाची पेरणी केली तरीही त्याचं होणारं नुकसान आणि कर्जाचा डोंगर कमी होणार नाहीये. अशावेळी सरकार कर्जमाफी करणार नसले तर त्यांनी शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी असंही सदाभाऊ खोत म्हणाले. याआधी भाजपनेही पवारांवर मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रावरुन टीका केली होती.
ADVERTISEMENT