मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नवीन सहकाऱ्यांसह कामाला लागले आहेत. Council of Ministers सोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ आणि रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीबद्दल पंतप्रधान मोदींनी या बैठकीत चिंता व्यक्त केली.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून आपण देशातील विविध भागांत लोकं रस्त्यावर फिरत आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये, मास्क घातला जात नाहीये असे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहत आहोत. हे चांगलं दृष्य नाहीये, आपल्यासाठी ही चिंतेची बाब आहे. एकीकडे कोरोना योद्धा आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मेहनतीमुळे आपण कोरोनाशी लढाई करत आहोत, लसीकरणाची गती हळुहळु वाढवत असताना असं चित्र पहायला मिळणं योग्य नसल्याची चिंता मोदींनी या बैठकीत व्यक्त केली.
यावेळी बोलत असताना मोदींनी सध्याच्या परिस्थितीत आपल्याला निष्काळजी राहून चालणार नाही. आपल्या एका चुकीचे खूप मोठे परिणाम होऊ शकतात आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण यामुळे मागे पडू शकतो असं स्पष्ट केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे, लोकं अशावेळी फिरायला घराबाहेर पडत आहेत. पण कोरोना अजुनही गेलेला नाही हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या सध्या वाढत आहे, अशा परिस्थितीत आपण काळजी घेणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले.
महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. मंत्री म्हणून आपण सर्वांनी लोकांच्या मनात भीती निर्माण न होता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाय योजायला हवेत हे सांगणं गरजेचं आहे असा सल्लाही मोदींनी या बैठकीत आपल्या नवीन सहकाऱ्यांना दिला.
ADVERTISEMENT