सातारा जिल्ह्यातील शिरवळ (ता. खंडाळा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केलं आहे. या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका होमगार्डला निलंबित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
शिरवळ पोलीस एन. डी. महांगरे, बी.सी. दिघे, चालक धायगुडे व होमगार्ड नरुटे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
घडलेल्या घटनेबद्दलची माहिती अशी की, मारहाणीची घटना बुधवारी रात्री घडली आहे. विद्यार्थी आरडाओरडा करत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाल्यानंतर संबधित चौघे पोलीस विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल वर गेले.
काहीही माहिती न घेता पोलिसांनी दिसेल, त्या विद्यार्थ्यांना झोडपण्यास सुरुवात केली. दरवाजे, कड्या तोडून रूममध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल एक तास सुरू होता.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी सकाळी विद्यार्थी संतप्त झाले. पोलिसांचा निषेध करत कॉलेजच्या गेट बाहेर आंदोलन सुरू केले. पोलिसांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.
या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली व राज्यात पाच ठिकाणी असलेल्या इतर पशु महावैद्यकिय कॉलेज मध्ये बंद पुकारण्यात आला. याचवेळी समाज माध्यमावर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलेल्याचे फोटो व्हायरल झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस दलातील संबधित चौघांना निलंबित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT