पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या १२ ऑडिओ क्लिप्स खऱ्या की खोट्या ते ठाकरे सरकारने सांगावं अशी मागणी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू ७ फेब्रुवारीला झाला. त्यानंतर दोन दिवसातच १२ ऑडिओ क्लिप्स या व्हायरल झाल्या. या क्लिप्समध्ये एक व्यक्ती अरूण राठोड आहे. तर एक आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप भाजपने पहिल्या दिवसापासून केला आहे. याप्रकरणी रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिला. आता या प्रकरणात समोर आलेल्या १२ ऑडिओ क्लिप्स या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे ठाकरे सरकारने सांगावं असं आता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण प्रकरणातली सरकारची नैतिकता काय? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. इंधन दरवाढीवरूनही त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. राज्य सरकारने इंधनावर लावलेला २७ रुपयांचा टॅक्स आधी कमी करावा आणि नंतर केंद्राच्या कराबद्दल भाष्य करावं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आज काँग्रेसने केलेलं सायकल आंदोलन म्हणजे फक्त दिखावा आहे अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारचा मृत्यू झाला. ७ फेब्रुवारीला तिने पुण्यातल्या इमारतीवरून उडी मारली. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणावरून संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. संजय राठोड हे या प्रकरणानंतर नॉट रिचेबलही होते. त्यानंतर संजय राठोड हे समोर आले ते थेट २३ फेब्रुवारीला. २३ फेब्रुवारीला ते पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. तिथे त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. या शक्तीप्रदर्शनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अखेर या सगळ्या घडामोडींनंतर २८ तारखेला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT