पुणे: पुणे भारी की मुंबई? असा वाद अनेकदा मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वादासाठी त्यांना कोणतीही कारणं पुरेशी असतात. असं असताना आता पुण्याने (Pune) मात्र एक गोष्टीत आता मुंबईला (Mumbai) देखील मागे टाकलं आहे. ते म्हणजे आता पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मुंबई पालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) मागे टाकत राज्यातील सर्वात मोठी महापालिका होण्याचा मान पटकवला आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठं शहर असलेल्या मुंबईचं क्षेत्रफळ हे 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. म्हणजेच आता पुणे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातलं सगळ्यात मोठं शहर बनलं आहे.
ADVERTISEMENT
पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या तब्बल 23 गावांचा समावेश हा पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने 30 जून रोजी घेतला आहे. यामुळे आता 23 गावांचा भूप्रदेश महापालिकेत समाविष्ट झाल्याने राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी पुणे महापालिकेची नवी ओळख निर्माण झाली आहे.
23 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर आता महापालिकेची हद्द ही 485 चौ. किलोमीटर एवढी झाली असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर महसूल विभागाच्या मते हे क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर एवढं झालं आहे.
34 गावे महापालिकेत समाविष्ट केली जावीत यासाठी उच्च न्यायालयात याचिका नागरी कृती समितीकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2017 साली कोर्टाने निकाल दिल्यानंतर 11 गावांचा सुरुवातीला समावेश करण्यात आला होता. पण इतर 23 गावांचा समावेश हा वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात येईल असा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता.
ज्यासाठी सरकारने हायकोर्टाकडे 3 वर्षांचा कालावधी मागून घेतला होता. ज्यानुसार आता उर्वरित 23 गावं ही महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या 23 गावांचा महापालिकेत समावेश लवकर व्हावा यासाठी आग्रही होते. अखेर आता राज्य शासनाने त्यावर अधिसूचना काढून हा निर्णय अंमलात आणला आहे. (Pune is now the largest municipal corporation in the state)
पाहा कोणकोणत्या गावांचा पुणे महापालिकेत करण्यात आला आहे समावेश:
खडकवासला, जांभूळवाडी, वाघोली, कोळेवाडी, म्हाळुंगे, सूस, वडाचीवाडी, किरकटवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, कोपरे, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी,नांदोशी, भिलारेवाडी, सणसनगर, मांगडेवाडी, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी, नांदेड, बावधन (बुद्रुक) आणि मांजरी (बु.) या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.
या गावांच्या समावेशानंतर येथील पायाभूत सुविधांवर पालिकेला काम करावे लागणार आहे. पाणी, मलनिस्सारण, शिक्षण आदी सुविधा उभारताना त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे.
या गावांमधील अंदाजे लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे. यातील बहुतांश गावांचा विकास आराखडा तयार झालेला आहे. या आराखड्याला अद्याप राज्य शासनाची मान्यता मिळालेली नाही. आता या गावांचा नवीन स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार की ‘पीएमआरडीए’चाच आराखडा लागू होणार का, याबाबत अस्पष्टता आहे.
पुणे महापालिकेचं क्षेत्रफळ नेमकं कसं वाढत गेलं?
सर्वात आधी म्हणजे 1997 साली एकूण 38 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. ज्यामुळे पुणे महापालिकेचं क्षेत्रफळ हे 250 चौरस किलोमीटर झालं होतं. त्यानंतर 2017 साली पुन्हा एकदा 11 गावांचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे महापालिकेचं क्षेत्रफळ हे 331.57 चौरस किमी एवढं झालं. पण आता थेट 23 गावांचा समावेश करण्यात आल्याने पुणे महापालिकेचं क्षेत्रफळ हे जवळजवळ 516 चौरस किलोमीटरपर्यंत (महसूल विभागाच्या अदांजानुसार) जाऊन पोहचलं आहे.
नव्याने समावेश करण्यात आलेल्या 23 गावांचं एकूण क्षेत्रफळ हे 184 चौरस किलोमीटर एवढं आहे. या 23 गावांमुळेच पुणे महापालिकेने सर्वात मोठी महापालिका होण्याचा मान देखील पटकावला आहे.
‘Home Isolation Ban : बंगला, फ्लॅटमध्ये राहणारे लोक Covid Center ला कसे येतील?’
दरम्यान, गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आल्यामुळे आता पुण्यातील पालिका प्रशासनाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या वाढणार आहेत. याशिवाय हा सगळ्याच पुण्याचा एकूण काराभारावर नेमका कसा परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT