पुणे : येथे मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी स्वतः अनेकदा ही नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखविली आहे. आज तर आपल्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऑफर दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. असं असतानाच पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आणि महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. माझिरेंसोबत जवळपास ४०० कार्यकर्त्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली. दाेन दिवसांत अजून राजीनामे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
निलेश माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. पण, २ दिवसांपूर्वीच त्यांना पदावरून हटविण्यात आलं होतं. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आणि पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांची भेट घेतली होती. आता मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंचे कट्टर समर्थक असलेले निलेश माझिरे हे शिवसेनेत जाणार का? हे बघावं लागणार आहे.
दरम्यान माझिरे यांनी सहा महिन्यांच्या काळात पक्ष सोडण्याचीही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जून महिन्यातही त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यावेळी वसंत मोरे यांनी मध्यस्थी करत शिवतीर्थावर निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणत ही नाराजी दूर केली होती. त्यानंतर माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
ADVERTISEMENT