ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ सेकंड यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ या स्कॉटलँडच्या Balmoral Castle मध्ये होत्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. शाही परिवाराने स्टेटमेंट काढत ही माहिती दिली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ७० वर्षे राणी पदावर होत्या. आता त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग असतील.
ADVERTISEMENT
ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आजच डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली होती. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर क्वीन एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
महाराणी एलिझाबेथ या सर्वाधिक काळ राणी म्हणून राहिल्या पदावर
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सर्वाधिक काळी राणीपदी राहिल्या. १९५२ ते २०२२ अशी ७० वर्षांची त्यांची राणी म्हणून कारकीर्द ही सर्वात प्रदीर्घ कारकीर्द ठरली. गुरूवारी दुपारीच एलिझाबेथ यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता रॉयल फॅमिलीने ट्विट करत त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. स्कॉटलंड येथील बालमोरल कॅसलमध्ये एलिझाबेथ यांचे कुटुंबीय जमले होते.
१९५२ मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी महाराणी म्हणून पदभार स्वीकारला होता. तहहयात त्या राणीपदी राहिल्या. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स हे पुढील राजे होतील. युनायटेड किंग्डमसोबत १४ कॉमनवेल्थ देशांचे ते प्रमुख होतील. बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. महाराणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स विल्यम्स हे सध्या बालमोरल या ठिकाणीच आहेत तर प्रिन्स हॅरी हेदेखील त्या ठिकाणी येतील.
क्वीन एलिझाबेथ यांनी मंगळवारी कंझर्व्हेटीव पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी त्यांचा एक फोटो समोर आला होता. त्या फोटोत क्वीन एलिझाबेथ हसतमुख दिसत असल्या तरीही त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसत होतं. आज त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.
१९५२ मध्ये एलिझाबेथ झाल्या होत्या क्वीन
१९५२ मध्ये क्वीन एलिझाबेथ यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्या ब्रिटनच्या महाराणी झाल्या. हे पद अजूनही त्यांच्याकडेच होतं. २ जून २०२२ या दिवशी महाराणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीला ७० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी एलिझाबेथ यांना मानवंदना देण्यात आली होती. या सोहळ्यासाठी राजवाड्याच्या बाल्कनीत संपूर्ण कुटुंबासह पारंपारिक पोषाखात उपस्थित होत्या. ब्रिटनमध्ये त्याच दिवशी ३ हजार ठिकाणी दीप महोत्सवही आयोजित करण्यात आला होता.
ADVERTISEMENT