राज्यात आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने शिवजयंती साजरी करताना नागरिकांना काही निर्बंध व अटी घालून दिल्या आहेत. शासकीय कार्यक्रमांनाही १०० पेक्षा जास्त लोकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. शिवनेरी गडावर आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली. भारतीय पुरातत्व विभागानेही आजच्या दिवसाचं औचित्य साधून विद्युत रोषणाई केली आहे.
ADVERTISEMENT
मात्र राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या रोषणाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. ऐतिहासिक आणि महान वारसा असलेल्या जागेवर पुरातत्व विभागाने अतिशय विचीत्र स्वरुपाची प्रकाशयोजना केली आहे. रंगीबेरंगी प्रकाशयोजना करुन हे ऐतिहासीक ठिकाण आता डिस्कोथेकसारखे दिसत असल्याचं म्हणत संभीजीराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता सरकारने शिवजयंती साजरी करताना काही अटी व निर्बंध घालून दिले आहेत. पण एकीकडे राजकीय सभांमध्ये मोठी गर्दी होत असताना शिवजयंती साजरी करताना सरकार अटी व निर्बंध घालत असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे. परंतू कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता आजचा दिवस साजरा करताना दक्षता घेणं गरजेचं असल्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.
ADVERTISEMENT